भारतीय शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण हे परंपरेने
एकल म्हणजे सोलो केले जाते. शिवाय, एकल असो अथवा समूह, आजही शास्त्रीय नृत्य
सादरीकरणात बहुतेक शैलींमध्ये आहार्य अभिनयाचा (कॉस्च्युम, प्रॉपर्टी, बॅकड्रॉप
इ.) फ़ारच कमी वापर केला जातो. सादरीकरणात साथसंगतही मोजकी घेतली जाते आणि नर्तकच
सादरीकरणाचे नेतृत्व करत असतो.
कथकच्या बाबतीत तर हा मुद्दा अधिकच अधोरेखित
होतो, याचे कारण म्हणजे एकतर कथकच्या वेशभूषेतील साधेपणा आणि दुसरे म्हणजे कथकच्या
सादरीकरणाचे बऱ्यापैकी अनिबद्ध रूप. अनिबद्धतेमुळे सादरीकरणात उपज भाग बऱ्यापैकी असतो.
यामुळे कथकशैलीच्या बाबतीत सादरीकरणाची एकूण जबाबदारी पुष्कळ प्रमाणात नर्तकावरच
असते, त्यामुळे एखाद्या कथक सादरीकरणाची समीक्षा किंवा त्यातील गुण-दोषांची चर्चा
म्हणजे खरंतर नर्तकाच्याच गुणदोषांची चर्चा असते. म्हणूनच नर्तकाच्या गुणदोषांच्या
चर्चेला शास्त्रकारांनीही महत्त्व दिले आहे. आजच्या नर्तक होण्याची मनीषा असणाऱ्या
विद्यार्थ्यांपासून, नर्तक म्हणून व्यावसायिक कार्य करणाऱ्यांपर्यंत आणि नर्तक
घडविणाऱ्या आचार्यांपर्यंत हा विचार आवश्यक आहे की, कोणाला आदर्श नर्तक म्हणावे,
कोणते गुण नर्तकात अनिवार्यपणे असलेच पाहिजेत, कोणते गुण अनिवार्य नाहीत पण
नर्तकाला उंचीवर नेणारे आहेत आणि कोणते दोष नर्तकाच्या गुणांना मातीमोल करणारे
आहेत.
अभिनयदर्पणात नर्तकलक्षणांचा स्वतंत्र विचार
नसला तरी पात्रलक्षणे दिली आहेत ज्यात नट व नर्तकाच्या गुणांची एकत्रित चर्चा केली
आहे. संगीतसमयसार, नर्तननिर्णय, नृत्तरत्नावली अशा नंतरच्या ग्रंथांमध्ये नर्तक व
नर्तकी दोघांच्या गुणदोषांची स्वतंत्र चर्चा दिसते.
शास्त्रात सांगितलेल्या गुणांपैकी काही गुण
नर्तकाला अंगभूत असणे आवश्यक आहे तर काही तालमीतून प्राप्त होतात तर काही अथक
रियाजातून प्राप्त करावे लागतात. पुढील काही गुण शास्त्रकारांनी सांगितले आहेत:
1. तालीम (सुविद्यता):
उत्तम गुरूंकडून
नृत्याची विधिवत तालीम घेतलेली असणे नर्तकासाठी अनिवार्य आहे. आजच्या तंत्रज्ञान
क्रांतीच्या क्षेत्रात अनेक नृत्य प्रकार
युट्यूब व्हिडिओ ट्युटोरियलच्या माध्यमातून शिकण्याची सोय असली तरी शास्त्रीय
नृत्य कला याला सन्माननीय अपवाद म्हणता येईल. आजही “सीना-बसीना”, प्रत्यक्ष
गुरूंकडून शिकण्याला पर्याय नाही.
याखेरीज, शास्त्रीय नृत्यकलेत, आजीवन
विद्यार्थी-दशा सांगितली आहे. व्यावसायिक नर्तक, अध्यापक म्हणून कार्य सुरू
केल्यावरही, तुमची तालीम सुरूच राहिली पाहिजे तरच, तुमच्या नृत्यात आणि
नृत्य-अध्यापनात चैतन्य टिकून राहील. अशा प्रकारे पद्धतशीर तालीम आणि आजीवन तालीम
हा नर्तकाचा पहिला अनिवार्य गुण म्हणता येईल.
2. रियाज (श्रमित्वं) –
नियमित रियाजाने
नर्तकाने आपल्या हस्तक, अंगसंचलनात वेग आणि अचूकता (perfection) प्राप्त केली
पाहिजे. अथक रियाजाने पायातून प्रत्येक बोल स्पष्ट काढला पाहिजे (चरणन्यासचातुर्य), यासोबत “वलनं वर्तनं गात्रे” (नृत्याच्या हालचालींमध्ये
गोलाई असणे) हाही एक गुण आवश्यक मानला आहे. रियाजाने प्रत्येक हालचाल लालित्य आणि
सौंदर्यपूर्ण होणे ज्याला कथकमध्ये तोड-मरोड म्हटले जाते.
3. अभिनयकौशल्य (सर्वाभिनयनेतृता) :
नर्तकाला डोळे, भुवया, हास्य इ. द्वारे चेहऱ्यातून तसेच एकूणच शारीर भाषेतून सर्व
प्रकारच्या व्यक्तिरेखा, सर्व रस तेवढयाच ताकदीने सादर करता यायला हवेत. अभिनय
कौशल्य प्राप्त करण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन, अभिनयाचा रियाज, त्याचबरोबर
नर्तकाचा स्वतःचा विचार आणि अभ्यास आवश्यक आहे.
4. लय-ताल-ज्ञान :
लय पक्की असणे, लयीची
समज असणे कलाकारासाठी आवश्यक आहे. कथक नर्तकासाठी तर लेहऱ्यावर विविध लयीच्या रचना
सादर करण्यासाठी, लेहऱ्याची उत्तम समज असण्यासाठी तर लय पक्की हवीच त्याचबरोबर
पढंत चांगली होण्यासाठीही लय स्थिर असणे आवश्यक आहे. लयीची समज खास करून सूक्ष्म
लयीची समज ही उपजत असावी लागते, मात्र अभ्यासानेसुद्धा लय पक्की होते.
कथक नर्तकाला लयी सोबत, तालचक्राचा एकूण आराखडा,
सम, खाली, भरीसह डोळ्यासमोर असणे आवश्यक आहे. लय तालाच्या ज्ञानाबरोबरच विविध
जाती, यती, ग्रह (अतीत-अनागत) वगैरे तांत्रिक बारकाव्यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
5. प्रयोगशीलता (कलाभिज्ञा
विद्याभीष्टप्रयोगज्ञा)
शास्त्राच्या चौकटीत राहूनही काळानुसार, प्रेक्षकांनुसार,
विषयानुसार नवनवीन प्रयोग करायची क्षमता नर्तकात असायला हवी. त्याचबरोबर नवीन
प्रयोग केवळ धाडसाने नव्हे तर त्याजोडीला सखोल अभ्यास करून सादर करायची क्षमता
असणे आवश्यक आहे.
6. सादरीकरणातील सफ़ाई: (सभाजय)-
सभेला म्हणजेच प्रेक्षकांना जिंकून घेण्याचा गुण
नर्तकात आवश्यक आहे, याला आजच्या भाषेत प्रेझेन्टेशन स्किल म्हणता येईल. नर्तक कधी
नृत्यातील अंगसंचलनातील बारकाव्याने, कधी अफ़ाट वेगाच्या तत्कारांनी तर कधी,
पायातून वेगवेगळे नाद काढून, कधी अद्भुत गिरक्या, आकाशचारी सारख्या उड्या/छलांग
अशा प्रेक्षकांना आवडीच्या गोष्टी नृत्यात घालून प्रेक्षकांना अचंबित करेल. आजच्या
प्रेक्षकांचा विचार करता, entertainment quotient च्या, शास्त्रीय नर्तकालाही
या प्रेक्षकांना अचंबित करणाऱ्या या गोष्टी सादर करणे आवश्यक आहे. कथक नर्तकासाठी
प्रेझेन्टेशनचा भाग म्हणजे चेहरा नृत्तांगातही भावपूर्ण, प्रसन्न ठेवणे (स्मितपूर्वकृतालापा)
आणि त्याहूनही महत्त्वाचा गुण म्हणजे नजर बांधणे ज्याला eye-contact म्हटले जाते.
शास्त्रकारांनी या गुणाला ’सुतारा’ म्हटले आहे.
7. उपज-क्षमता (सुबुद्धित्वम्)
कथकच्या ताल आणि
भावांगात नर्तकाला आयत्यावेळी काही क्षणात विचार करून उपज सादरीकरण करता आले
पाहिजे. उपज क्षमता ही दीर्घ अनुभवानंतर आणि उपजच्या अशा स्वतंत्र अभ्यासानंतर
प्राप्त होते.
8. भाव-अखंड राखणे व अष्टावधान (अत्रुटद्
-रसता) :
नाटकाच्या भाषेत याल बेअरिंग न सोडणॆ म्हणता येईल. लाईव्ह-म्युझिक
म्हणजेच साथीदारांसह सादरीकरण करताना, एकाचवेळी स्वतःचे नृत्य आणि साथीदारांचे
नेतृत्व अशी तारेवरची कसरत करतानाही, नर्तकाने आपले तालांग आणि विशेषतः भाव अंगाचे
बेअरिंग न सोडणे, भाव अखंड व्यक्त करणे हे कसोटीचे असते. याला जोडूनच कलाकाराला अष्टावधान
हा गुणही आवश्यक आहे. साथीदारांशी जमवून घेत, नृत्यात प्राण ओतून, त्याचवेळी,
वेशभूषा इ. सावरून, प्रेक्षकांच्या प्रतिसादाचे भान ठेवून, असे बहु-अवधाने ठेवून
सादरीकरण करतो तोच खरा उत्तम नर्तक होय.
9. आरंभामोक्ष विज्ञत्वं -
शास्त्रात
शतकांपूर्वी सांगितलेला गुण आजही प्रत्येक नर्तकात आवश्यक आहे. आपल्या सादरीकरणाची
सुरुवात प्रभावी आणि शेवट क्लायमॅक्सला नेणारा कसा करावा याची समज असणे हा
नर्तकासाठी मोठा गुण ठरतो. सादरीकरण कुठे थांबवायचे म्हणजे रटाळ होणार नाही याची
अचूक समज असणे हा प्रगल्भ कलाकाराचा गुण आहे. यालाच जोडून आणखी एक गुण
शास्त्रकारांनी सांगितला आहे तो म्हणजे- आपल्या गुणदोषांची पूर्ण जाणीव असणे आणि
त्यानुसार सादरीकरणात गुण अधिक अधोरेखित करणे आणि दोषपूर्ण अंग टाळता येणे.
10. कुतुहल:
अन्य शैलींबद्दल तसेच वर्तमानात देशविदेशात चालू असलेल्या अन्य प्रयोगांबद्दल
कुतुहल असणे व त्यांची माहिती करून घेणे हा कलाकाराला प्रगल्भ बनवणारा गुण आहे
11. गीत-वाद्याची समज (गीतवाद्यानुकारित्व)
लाईव्ह म्युझिक म्हणजेच साथीदारांसह सादरीकरण करताना टीम म्हणून काम करणे, साथीदार
कलाकारांच्या ज्येष्ठतेनुसार त्यांच्याप्रती मंचावर आदर व्यक्त करणे, नर्तक मुख्य
आणि साथीदार गौण अशी भावना टाळून एक संच म्हणून, टीम म्हणून काम करणे हा आजच्या
काळात नर्तकासाठी महत्त्वाचा गुण आहे.
त्याचबरोबर स्वतः नर्तकाला गीत व वाद्याची
माहिती असणे, गायन-वादनाची तालीम घेतलेली असणे हा एक उपकारक गुण ठरतो. अनेक
मान्यवर कथक नर्तक उत्तम तबला वादक व गायक होते, आजही आहेत. ’स्वयं गा कर
प्रस्तुती’ हे अत्यंत कौशल्याचे समजले जाते. शास्त्रकारांनी मधुरस्वरा म्हणजेच
गायनही अवगत असलेल्या नर्तकीला सर्वश्रेष्ठ मानले आहे. नृत्तरत्नावलीमध्ये तर
म्हटले आहे, नर्तकी गायनी स्याच्चेत् भोगिनी पात्रमन्यथा॥
नर्तकी जर गायिका सुद्धा असेल तर तिची बातच और!
12. शारीरिक गुण
नर्तकापेक्षा नर्तकीच्या
बाबतीत खरं तर शास्त्रकारांनी शारीर गुणांची चर्चा वरील सर्व गुणांच्या आधी केली
आहे. नृत्य ही दृश्य कला असल्यामुळे, सादरीकरणात शरीर हे मुख्य माध्यम असते
त्यामुळे नर्तक किंवा नर्तकीचे शरीर सुडौल असायला हवे. फ़ार उंच नको किंवा फ़ार
बुटका नको. गोरा असो अथवा सावळा, चेहरा भावदर्शी म्हणजेच expressive असावा. कोणतेही
शारीरिक व्यंग नसावे. मात्र नृत्तरत्नावलीत जायसेनाने या शारीर गुणांच्या बाबतीत
उदार दृष्टिकोण घेतलेला आहे.
रूपयौवनयुक्तानां सहस्रेऽपि
मृगीदृशाम्।
कलागुणसमेतानां नर्तकी नैव
लक्ष्यते।
सौंदर्य असलेल्या हजार नर्तकींपेक्षा कलेमध्ये
प्रावीण्य मिळवलेली नर्तकी श्रेष्ठ. आजच्या काळातही हे तेवढेच सत्य आहे, कारण शारीर
लावण्य विशेष नसूनही कलेमध्ये उंची गाठलेले अनेक कलाकार आपण पाहतो.
13. अध्यापन कौशल्य:
शास्त्रकारांनी
हा गुण केवळ पुरूष नर्तकांमध्येच आवश्यक मानला आहे, कारण परंपरेने पुरुष
नर्तकांना, पुढे आचार्य किंवा गुरू रूपात पाहिले आहे, स्त्री नर्तकीला नेहमीच performer रूपात पाहिले आहे.
मात्र आज एकविसाव्या शतकातील शास्त्रीय नर्तनाचे क्षेत्र पाहता, अध्यापन कौशल्य व शिष्य
तयार करण्याची क्षमता प्रत्येकच नर्तकात असणे आज आवश्यक झाले आहे
शास्त्रकारांनी या नृत्यकलेशी संबंधित गुणांखेरीज
काही सामान्य गुणही नर्तकांमध्ये आवश्यक मानले आहेत, जसे विनम्रता, निर्व्यसनीपणा ई.
या परंपरेने सांगितलेल्या गुणांखेरीज अन्यही
काही गुण आजच्या काळाच्या दृष्टीने या यादीत समाविष्ट करावेसे वाटतात. ते पुढीलप्रमाणे:
14. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग:
तंत्रज्ञानक्रांतीच्या
या काळात शास्त्रीय कलाकाराने आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली पाहिजे व
त्याचा परिपूर्ण उपयोग केला पाहिजे. कथक नर्तकांसाठी यात, लेहऱ्याच्या applications पासून, रेकॉर्डिंगची
माहिती असणे, सोशल मिडियाचा प्रभावी वापर करता येणे असे अनेक गुण अपेक्षित आहेत.
2. उदारमतवादी असणे: आज कथकचा प्रसार व नवीन
प्रयोग प्रचंड होत आहेत. अशा काळात, आपल्याहून भिन्न शैली, घराणे आणि भिन्न मत
असलेल्या नर्तकांप्रती आदराची भावना नर्तकामध्ये असणे आवश्यक गुण आहे.
दोष:
बहुतेक शास्त्रकारांनी दोषांची तपशीलवार चर्चा
केली नाही तर गुण विशद केल्यावर, या गुणांचा अभाव असणे म्हणजेच दोष असे नमूद केले आहे.
तरीही लय-तालातील कमी-अधिकपणा लक्षातच न येणे, शरीरातील व्यंग, रियाजाचा आळस, व्यसनांच्या
आहारी जाणे, उपज सादर करण्याचे प्रसंगावधान नसणे असे काही दोष नमूद केले आहेत. या
दोषांखेरीज आजच्या काळानुरूप अन्यही काही दोष येथे नमूद करावेसे वाटतात जे आजच्या उत्तम
नर्तकांनी टाळले आहेत.
1. परंपरा आणि आधुनिक प्रवाह यातील कोणतेतरी टोक
गाठणे:
परंपरेचा आंधळा आग्रह नर्तकाच्या नृत्याला
साचलेपणा देतो. प्रेक्षकांसाठी बदलत्या काळानुसार, परंपरेच्या चौकटीतच
सौंदर्यपूर्ण बदल करण्याची मानसिकता नसणे, हा आजच्या काळासाठी मोठा दोष खरा. आणि
त्याचबरोबर, परंपरेला बासनात गुंडाळून आधुनिकतेच्या नावाखाली, कोणत्याही गोष्टींना
आपल्या शैलीत घुसवणे हा त्याहून मोठा दोष समजला पाहिजे.
2. काल्पनिक स्टारडम आणि त्यातून येणारी अव्यावसायिकता:
शास्त्रीय कलेकडे समाजाने नेहमीच पूजनीय व दिव्य
मानले आहे. मात्र अनेकदा कलाकार गल्लत करून दिव्य कलेऐवजी व्यक्ती म्हणून स्वतःला
अधिक दिव्य आणि असामान्य समजून बसतो. मग त्यामुळे, प्रामाणिक कला-साधनेपेक्षा, आपले
महत्त्व प्रस्थापित करणे, प्रेक्षकांना तुच्छ लेखणे, अध्यापन सचोटीने न करणे, कार्यक्रमाच्या
वेळा, तांत्रिक बाजू न सांभाळणे, अशा दोषांना तो कलेच्या पांघरूणाखाली लपवायला पाहतो.
मात्र, आजच्या ज्येष्ठ कलाकारांनी या दोषांना लांब ठेवल्यामुळेच कलेचे शिखर गाठले आहे.
असं म्हणतात की गती ही निश्चित आहे, तुम्ही पुढे
जात नसाल तर तुम्ही मागे राहता. कलावंताचा प्रवास, गुण जोपासण्यामुळे आणि दोष
टाळल्यामुळेच शिखराच्या दिशेने होईल, अन्यथा काही न करताही तोच प्रवास गर्तेच्या
दिशेने असेल.
No comments:
Post a Comment