Wednesday, April 1, 2020

रास आणि कथक:



कृष्णरूप साकारताना रासधारी
भारतीय कला परंपरेत अनेक कला प्रकार कृष्णचरित्रावर जोपासले आहेत. प्राचीन भारतीय नाट्यकलाही त्यांपैकीच एक. रास किंवा रासलीलाही असाच लोक-नाट्याचा एक प्रकार जो कृष्ण-कीर्तनातून निर्माण झाला आणि कृष्णभक्तीमुळे बहरला. आज रास किंवा रासलीला या सामान्य नावाचा कलाप्रकार सौराष्ट्रापासून मणिपूरपर्यंत आणि थेट दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत अनेक राज्यांत वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रचलित झालेला दिसतो, अर्थात या सर्व प्रकारांमध्ये कृष्ण-कथा-कीर्तनाचा अंतरात्मा समान आहे. मात्र आज या लेखात वृंदावनात जन्मलेल्या आणि बहरलेल्या “ब्रज की रासलीला” या नाट्य-प्रकाराचा विचार कथकच्या संबंधाने करणार आहोत.

रास: प्राचीनता

रास याची व्याख्या शास्त्रकारांनी ’रसांना समूहो रास:’ अर्थात, विविध रसांचे मिश्रण असलेले सादरीकरण अशी केली आहे. रास हा शब्द संस्कृत नव्हे तर रास शब्द आणि रास नृत्य दोन्ही मूळात देसी आहेत. रास याच नावाचा एक देसी ताल तसेच एक देसी काव्यछंद आहे. (तेत्तिगिध इति शब्देन नर्तनं रासतालतः।- भरतकोश). रास या नृत्यप्रकाराचा उल्लेख नाट्यशास्त्रापासून सापडतो. मुख्य दहा नाट्यभेद म्हणजेच दशरूपके सांगितल्यावर भरताने अनेक उपरूपके सांगितली आहेत. ही उपरूपके म्हणजे लहान नाट्यप्रकार ज्यात नृत्य आणि नाट्याचं मिश्रण असेल. रास किंवा रासक याचा उल्लेख असे एक उपरूपक म्हणून येतो. भरतोत्तर काळात, याचे नृत्यरासक (नृत्यावर अधिक भर) आणि नाट्यरासक (नाट्यावर अधिक भर) असे उप-प्रकारही केलेले दिसतात. आजच्या रासलीलेमध्ये या दोन्ही प्रकारांचे उत्तम मिश्रण दिसून येते. हल्लीसक हे उपरूपकही रासनृत्याशी साधर्म्य असलेले आहे.

भागवतातील रासलीलेच्या उगमाची कथा:
श्रीमद्भागवतपुराणात वृंदावनातील रासलीलेच्या उगमाची कथा सांगितली आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री श्रीकृष्णाने यमुनेच्या तीरावर गोपींना रासक्रीडेसाठी आमंत्रित केले. मात्र रासक्रीडा रंगात आली असतानाच, कृष्ण अदृश्य झाला, त्याच्या विरहात व्याकूळ झालेल्या गोपी त्याच्या सहवासातील सुंदर क्षण आठवू लागल्या. श्रीकृष्णलीला आठवून, त्यांचे नाट्यमय रूप सादर करून त्याद्वारे त्या कृष्णालाच अनुभवू लागल्या. इथूनच कृष्ण-कथा नाट्यातून रासलीलेची सुरुवात झाली. या पौराणिक कथेतून रासलीलेच्या परिवर्तनाविषयी निष्कर्ष काढता येईल. कथेनुसार रासलीलेचे दोन भाग आहेत, पहिला भाग कृष्णाने स्वतः सुरू केलेला, म्हणजेच हे रासलीलेचे प्राचीन रूप. तसेच दुसरा भाग, गोपींनी म्हणजेच भक्तांनी निर्माण केलेला. आजच्या रासलीलेत असे दोन भाग स्पष्ट दिसतात. पहिला नित्य रास (कदाचित नृत्य चे अपभ्रंशित रूप) जे प्राचीन रूप आहे आणि दुसरा लीला-भाग जो, रासलीलेच्या पुनरूज्जीवनाच्या काळात त्यात नव्याने घातला गेला.

रास: ऱ्हास आणि कथकच्या छायेत पुनरुज्जीवन

इस्लामी राजवटींच्या काळात, रास किंवा रासक नृत्याचा ऱ्हास झाला. भक्तिपूर्ण अशा प्रकारात प्रेक्षकांच्या अभिरुचीप्रमाणे, शृंगार आला, चमत्कृती आली, आणि रासचे मूळ रूप लोप पावत चालले. असे म्हणतात की नवाब वाजिद अली शहांनी रास नृत्याला अनुसरूनच नृत्यनाट्याची निर्मिती केली ज्याचे नाव त्यांनी रहस ठेवले. रहस हे रासचेच शृंगारप्रधान रूप होते.

आज जी रासलीला प्रचलित आहे, तिचे पुनरुज्जीवन 15 व्या शतकात वृंदावनात झाले. याच काळात उत्तर भारतात भक्ती संप्रदायाची लाट आली होती आणि प्रत्येक कलाप्रकार भक्तिरंगात न्हाऊन निघत होता. याच काळात ब्रज रासलीलेला वैष्णव आचार्यांनी नव संजीवनी दिली. वल्लभाचार्य, स्वामी हरिदास, हितहरिवंशी, घमंडाचार्य, श्री नारायण भट्ट अशा अनेक आचार्यांची नावे घेता येतील. रासलीला या काळात नवीन रूपात बहरली. याच काळात उदयाला आलेल्या अष्टछाप कवींच्या काव्यामुळे रासलीलेतही समृद्ध साहित्याची भर पडली. आता रासलीला हे केवळ लोकनाट्य न राहता, सकस साहित्याने समृद्ध, सुंदर नृत्याने युक्त, अनेक गीतीप्रकारांनी सजलेला असा एक प्रगल्भ नृत्य-नाट्यप्रकार बनला होता. ध्रुपद शैलीतील संगीताचा वापर तर यात आधीपासून होताच त्यात आता ब्रजसाहित्यातील अनेक पदे, सवैय्या, विष्णुपदे, कवित्त, छंद यांची भर पडली. आचार्यांनी रासलीलेतील नृत्यास अधिक सुसंस्कृत बनविण्यासाठी तत्कालीन मंदिर व दरबारांमधील नृत्य-गुरूंना आमंत्रित केले. हे नृत्यगुरू उत्तर भारतात कथकचे किंवा नेमके सांगायचे तर कथकच्या पूर्व अशा शैलीचे प्रचालन व प्रशिक्षण करत असणार. या नृत्याचार्यांनी रासधारींना नृत्याचे शिक्षण तर दिलेच पण एकूणच रासलीलेतील नृत्य-भागाचे पुनरुत्थान केले. याचे प्रतिबिंब गोचरण-लीलेत दिसून येते, जेव्हा तोष नावाचा गोप कृष्णाला नृत्याचे प्रशिक्षण देतो तेव्हा कथकच्या प्रचलित आरंभीच्या बोलापासून, तत् तत् थुं थुं पासून सुरुवात करतो.

रासलीलेतील नृत्य भागाचे श्रेय श्रीवल्लभ यांना दिले जाते. हे वल्लभ स्वतः नृत्याचार्य असून राजस्थान दरबारात होते. कथकमध्येही वल्लभ हे नाव येते, अनेक कवित्तांच्या रचना यांच्या नावाने, नटुआ-वल्लभ या नावाने आहेत. रास लीलेत पूर्वीपासून प्रचलित असलेले अनेक परमेलू किंव परमूल (बहुतेक ठिकाणी परमूल हा शब्द वापरला आहे) आजही कथकच्या जयपूर घराण्यात प्रसिद्ध आहेत. रासचा मूळातला उल्लेख हा नृत्त म्हणून आहे किंवा काहीवेळा नृत्य म्हणून आहे. रासलीलेचे पुनरुज्जीवन झाले तेव्हा नव्या रूपात, मूळच्या नृत्यानंतर नाट्याचाही भाग जोडला गेला. आज रासलीलेच्या सादरीकरणात सुरूवातीला जुन्या पद्धतीप्रमाणॆ नृत्य असते आणि मध्यंतरानंतर रासमंडळी एखाद्या कृष्णलीलेचे नाट्य सादर करतात. रासमंडळींसह या नव्या रूपाच्या बांधणीत जे कथाकार सहभागी झाले होते, त्यांचा हा नाट्यभाग रासलीलेत नव्याने सुरू करण्यात नक्कीच मोठा हातभार लागला असणार. कथकारांकडे कथा-कीर्तनाची परंपरा होतीच, मात्र दरबारात आवडेल असे नृत्य करताना कथकारांचे प्राचीन नाट्यमय कथाकथनाचे रूप मागे पडले होते. ते हरवलेले नाट्यरूप रासलीलेत कथकारांनी शोधायचा प्रयत्न केला असणार.

अशा प्रकारे, कथकारांनी रासलीलेतील नृत्याचे लालित्य तर वाढवलेच पण त्याचबरोबर आपली हरवत चाललेली कथाकीर्तनाची परंपरा रासलीलेत नव्याने रोवण्याचा प्रयत्न केला.

रासलीला – सादरीकरणाचे स्वरूप

रासलीलेची सुरुवात मंगलाने होते. रासमंडलीचा स्वामी मंगलाचरणाचे गायन करतो. त्यानंतर बाकी मंडलीतील गायकही वातावरण निर्मितीसाठी वेगवेगळी पदे गातात. मंगलात यानंतर मध्यभागी बसलेल्या राधाकृष्णांची आरती केली जाते. यानंतर सर्वांच्या विनंतीनंतर राध आणि कृष्ण गोपीमंडलात येतात रासलीलेचा नृत्त भाग सुरू होतो. यात कृष्ण, राधा आणि इतर गोपी एकल रूपात विविध परमूलांचे सादरीकरण करतात. या परमूलांचे  बोल आणि कथकचे बोल यांत खूप साधर्म्य आहे. श्रीराधाकृष्णलीला प्रसंगातील हा परमूल पहा:

ता तिधा थेई थेई ताथेई - ता तिधा थेई थेई ताथेई
ता तिधा थेइयता - ता तिधा थेइयता
थेई ऽ ऽ ऽ त त त ता, थेई ऽ ऽ ऽ त त त ता

या परमूलाला कथकचा तुकडा म्हणता येईल, इतके बोलसाधर्म्य आहे. अनेक परमूल किंवा परमेलू असे आहेत, की जे कथकमधील परमेलूच्या व्याख्येत बसतात. जसे हा परमेलू:

तकिट तकिट धिलांग धिक तक तो दीम ताम
तकिट तकिट धिलांग धिक तक तो दीम ताम
ता तू त्रंग थुन थुन तो, धिक तू त्रंग, थुन थुन तो
ता तूंग तूंग धिक तूंग तूंग धिकतक
थुंग थुंग तक थुंग थुंग तक, थोंग तक थोंग तक ददिगिन थेई
तततता थेई तततता थेई तततता थेई

इथे रासमधील नृत्ताचा भाग संपतो, काही वेळा याच भागात, मयूर नृत्य (पिसारा घेऊन गुडघ्यांवर फ़िरून केलेले नृत्य), दंड रासक (टिपऱ्या घेउन) असे रंजक प्रकारही केले जातात.
या नृत्त भागानंतर, एक मध्यंतर येते, त्यातही भक्तियुक्त पदांचे गायन केले जाते. या मध्यंतरानंतर कृष्णलीलेचा भाग सुरू होतो. या भागात मंडली नृत्य, गायन, नाट्यातून एखादा कृष्णलीलेचे नाट्यमय सादरीकरण करतात. रासलीलेत सादर केले जाणारे कृष्णलीलेचे प्रसंग बहुतेकदा पुराणांमधले असतात, त्याचबरोबर पुराणांमधील प्रसिद्ध कथांचे लोकसाहित्यातले वेगळे रूपही पहायला मिळते तर कधी पूर्णपणे नवीन कथाही सादर केल्या जातात, जसे राधा व कृष्णाचा वाङ्‍निश्चय.

रास आणि कथक:

रास आणि कथक कृष्णकीर्तनातून निर्माण झालेल्या या दोन्ही नृत्य प्रकारांमध्ये अनेक साधर्म्ये आहेत. चारी, मंडले, हस्तक याबाबतीत तर काही प्रमाणात साधर्म्य दिसतेच. तसेच अनेक पारिभाषिक शब्द जसे, सुढंग, लाँग-डाँट, उरप-तिरप हे रासमध्येही प्रचलित आहेत, अनेक परमूलांमध्ये ते वापरले जातात तसेच त्यांचे अर्थही जवळपास सारखे आहेत. हरिव्यासदेवाचार्यांचा हा छंद पहा:
सुढंग हस्तक :
स्रोत: रासलीला तथा रासानुकरण विकास

रासमंडल मधि निर्तत मोहनी मोहन, वृंदावन नवनिकुंज सुंदर आनंदघन।
लाग दाट उरप तिरप उघटत संगीत सुलप, राग रंग तान मान गान सुघर सप्त सुरन॥

अंगसाधर्म्यही काही प्रमाणात आहे. त्रान हा बोल उडी मारून करणे, सुढंगचे थाटसारखे अंग इ.
रास आणि कथकमध्ये परस्पर-देवाणघेवाण असलेले नाते आहे असे म्हणता येईल. रासच्या प्राचीन रूपातील परमेलू, तुकडे पुढे इतके प्रसिद्ध झाले की स्वतंत्र रचना म्हणून केले जाऊ लागले, कथकमध्ये हे परमेलू केले जाऊ लागले. याउलट, रासच्या पुनरुत्थानात कथक आचार्यांनी हातभार लावला आणि रासलीलेतील नृत्य भागास लालित्यपूर्ण बनवले. तत्कालीन राजाश्रयाला असलेल्या कथकारांना दरबारात आवडेल असे सादरीकरण करताना आपल्या कथाकीर्तन रूपाला मागे ठेवावे लागत असे आणि चमत्कृतीवरच भर द्यावा लागत असे. त्यांनी मग लोप पावत चाललेली आपली कृष्णनाट्याची परंपरा जणू नव्याने रासलीलेत शोधली.
रास आणि कथक शतकानुशतकांचे अनेक चढ उतार पाहिलेल्या नृत्यशैली. दोन्ही शैलींमध्ये त्या त्या काळात, कधी नृत्यावर जास्त भर होता, तर कधी नाट्यावर. दोन्ही शैली एकमेकींना समांतर वाटचाल करत राहिल्या, एक लोकाश्रयाने, लोकनाट्यमंचावर तर दुसरी राजाश्रयाने दरबार व मंदिरांमध्ये. तरी या वाटचालीत दोन्ही शैलींचे एकमेकींवर प्रभाव झाले, आदान-प्रदान झाले. मात्र एकीच्या आपत्काळात दुसरीने तिला सावरले, ते आपल्याकडची अशी नाट्यपरंपरेची संपत्ती देऊन, ज्या संपत्तीला तिच्या दरबारी रूपात आता किंमत उरली नव्हती.   







No comments:

Post a Comment