कथकमधील प्रचलित शिक्षणपद्धतीचा
आलेख
अज्ञाननेत्र लागले, ज्ञानशलाके उघडिले।
तया गुरुची पाउले, देखिली म्यां॥
गुरूगीता
भारतीय शिक्षण व्यवस्थेत प्राचीन काळापासून
आजच्या व्हर्च्युअल क्लासरूम पर्यंत गुरू-शिष्य या नात्याला महत्त्व आहे. कलाप्रकारांच्या
बाबतीत तर ते ठळकपणे जाणवते. भारतात प्राचीन कला परंपरा आणि नृत्यप्रकार शतकानुशतके
टिकले आहेत. पाश्चात्त्य देशांमधील कला प्रकारांपेक्षा, आपल्याकडील कलांचा
विकास आणि प्रवास पुष्कळ वेगळा आहे, आणि त्याचे कारण येथील गुरूशिष्यपरंपरा आहे.
विशेष करून नृत्यकलेच्या बाबतीत, त्यातही कथकच्या संदर्भाने असे म्हणता येईल की कथकच्या वर्तमान रूपावर गुरू-शिष्य परंपरेच्या बदलत्या रूपांचे अनेक साधक-बाधक परिणाम झाले आहेत.
नृत्यपरंपरा आजपर्यंत क्लासरूम टिचिंगच्या बाहेरच अधिक रुजली आणि म्हणूनच शिक्षक-विद्यार्थी नात्याहून अधिक भावनिक अशा गुरू-शिष्य नात्याच्या कोंदणात अधिक खुलली आणि त्याच बंधनातही राहिली.
शास्त्रकारांनी गुरूचे जे अनेक प्रकार सांगितले, त्यातून केवळ शिक्षक या परीघापेक्षा गुरूंची व्याप्ती किती अधिक आहे, ते समजून येईल. एका प्रकारचे गुरू दिव्यासारखे असतात, स्वतः जे अंधारात राहून शिष्यांना प्रकाश देतात, अर्थात, स्वतःला जे मिळू शकले नाही किंवा सहजसाध्य झाले नाही, ते शिष्यांना मात्र कसे मिळेल याची काळजी घेतात. एका दिव्यापासून अनेक दिवे प्रकाशित होतात, जसे तयार होणारे अनेक शिष्य. दुसरे एक गुरू चंदनासारखे असतात, केवळ त्यांच्या सहवासानेच शिष्य अनेक गोष्टी त्यांच्याकडून घेतात.
आणखी एका प्रकारच्या गुरूंना भ्रमरी गुरू म्हटले आहे, भुंगा जसा एखादा कीडा आणून एका छिद्रात ठेवतो आणि त्याच्या भोवती गुंजन करून करून त्याला स्वतःसारखा करून टाकतो, तसेच हे श्रेष्ठ गुरू शिष्याला आपल्या सारखे बनवतात.
वेदकालापासून एकविसाव्या शतकापर्यंत गुरूशिष्य परंपरा अनेक रूपांत बदलली आहे. प्रत्येक रूपात या परंपरेचे आयाम वेगळे होते आणि गुरू शिष्य नात्याचे रंगही वेगळे होते.
प्राचीन काळात ज्ञानसाधने अतिशय मर्यादित होती, शब्दप्रमाणाला
अतिशय महत्त्व होते, त्यावेळी सर्वार्थाने शिष्य गुरूंवर अवलंबून होते. गुरूशिष्यपरंपरेचे
सर्वात जुने रूप अगदी उपनिषदांपासून दिसून येते, ते म्हणजे गुरुकुल पद्धतीचे.
उपनयन संस्कार झाल्यावर शिष्य गुरूकुलात शिक्षणासाठी जात व तिथेच पुढची काही वर्षे
वास्तव्य करून विविध विषयांचे शिक्षण घेत. विविध विषयांच्या शिक्षणासोबतच, शिष्य तिथे
आश्रमातील इतरही कामे करत असत. गुरू अध्यापनासाठी शुल्क आकारत नसत मात्र शिक्षण
संपल्यावर शिष्याने यथोचित गुरुदक्षिणा अर्पण करणे अपेक्षित असे.
याच आचार्यांच्या
स्वतंत्र गुरुकुलाचे प्रगत रूप म्हणजे पुढच्या काळात दिसणारी तक्षशीला, नालंदा सारखी
विश्वविद्यालये जेथे गुरुकुल पद्धतीच असली तरी प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र
आचार्य असत तसेच, विद्यार्थ्यांना अनेक सोईसुविधा तेथे उपलब्ध असत जसे, ग्रंथालये,
नाट्यशाला, सभागृहे इ.
नृत्याचा विचार करता प्राचीन गुरूशिष्य परंपरा औपचारिक आणि अनौपचारिक अशा अनेक रूपांत दिसते. नाट्यशास्त्र परंपरेतील अनेक आचार्यांकडे अनेक शिष्य व्यक्तिगत नर्तनाचे शिक्षण तर घेतच होते, मात्र त्याचबरोबर या विश्वविद्यालयांमध्येही नृत्य विषय शिकवला जात असे. याखेरीज, मंदिरांच्या आश्रयाने असलेले नर्तक पुढे नृत्याचार्य रूपात अनेक नर्तक घडवत असत. शिवाय, दरबारात नियुक्त असलेले अनेक नर्तक, राजकुमारींना किंवा अन्य श्रीमंत घरातील कन्यांना नृत्याचे शिक्षण देण्यासाठी नियुक्त केले जात असत.
पुढील काळात अनेक दरबारांनी नृत्याला विशेष आश्रय दिला, महाराजा मानसिंग, राजा छत्रसालासारखे जाणते राजे तर होतेच पण त्याचबरोबर स्वतः समर्थ नर्तक असलेले रायगढच्या चक्रधरसिंह आणि नवाब वाजिद अली शाह यांच्यासारखे राजेही होते. या काळात राजांच्या नाटयशालेत आश्रयास असलेल्या अनेक नर्तकांना शिक्षण देण्यासाठी राजा देश विदेशातील नृत्याचार्यांना खास पाचारण करत असत. याचबरोबर, चक्रधरसिंहांनी तर सामान्य घरातील नृत्याचे अंग असलेल्या मुलांना आश्रय दिला व जयलाल महाराजांसारख्या श्रेष्ठ गुरूंकडून त्यांना तालीम दिली व त्यांना नर्तक म्हणून घडवले.
याच विविध ठिकाणच्या दरबारांमध्ये नियुक्त आचार्यांनी
त्या त्या राजांच्या आश्रयाखाली नृत्यपरंपरेचा उत्कर्ष घडवला आणि यातूनच पुढे कथकची
वेगवेगळी घराणी निर्माण झाली. लखनौ, जयपूर, बनारस, रायगढ ही घराणी आजपर्यंत चालत आली
आहेत. प्रत्येकाचा स्वतंत्र बाज असलेली ही घराणे परंपरा कथकच्या गुरू-शिष्य
परंपरेचं सर्वात ठळक रूप आहेत.
गुरूशिष्य परंपरेत शिष्य गुरूंकडे केवळ नृत्याचेच शिक्षण घेत असे असे नाही तर एका नर्तकाची जीवनशैली कशी असते, त्याचा जीवंत अनुभव घेत असे. आपण ज्या क्षेत्रात कार्य करायचे ठरवले, त्या क्षेत्रात यशस्वी झालेली व्यक्ती कशी राहते, कशी बोलते, तिची दैनंदिनी कशी असते याचे प्रॅक्टिकल शिक्षण मिळणे, भावी नर्तकांसाठी फ़ार उपयोगाचे आणि प्रेरक होत असे. त्याचबरोबर, नृत्याबरोबर वादन, गायन, रंगभूषा अशा अनेक संबंधित विषयांचीही ओळख त्याला आपसुकच मिळत असे.
पुढे स्वातंत्र्योत्तर काळात नृत्य संस्थागत रूपात नव्याने प्रस्थापित झाले. शाळांमध्ये विषय म्हणून शिकवले जाऊ लागले. अनेक विद्यापीठांमध्ये इतर शैलींबरोबरच कथकचेही पदवी वगैरे अभ्यासक्रम सुरू झाले. अनेक मान्यवर व घराणेदार नृत्य आचार्यांना तेथे सरकारद्वारा नियुक्त केले गेले. दिल्लीच्या कथक केंद्रापासून, इंदिरा संगीत कला विश्वविद्यालय, पुण्याचे ललित कला केंद्र अशी अनेक नावे घेता येतील. मात्र विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांवर तेव्हाही, त्या त्या गुरूंचा, व त्या त्या घराण्याचा शैलीचा पगडा राहिला आहे.
या खेरीज अखिल भारतीय महाविद्यालयासारख्या अनेक संस्थांनी आपले अभ्यासक्रम सुरू केले आणि थोड्याच काळात ते खूप प्रचलित व प्रसिद्ध झाले.
तोपर्यंत सत्तर ऐंशीच्या दशकानंतर पंडिता रोहिणी भाटे, गुरू कुमुदिनी लाखिया अशा अनेक दिग्गज स्त्री नर्तक आणि गुरूंच्या अथक प्रयत्नामुळे कथकचा प्रचार सामान्य घराघरांमध्ये झाल्या.
नृत्य शिक्षणाभोवतालचे बदनामीचे, साशंकतेचे वलय संपून मध्यमवर्गीय मुली एक उत्तम कला म्हणून कथकचे शिक्षण घेऊ लागल्या होत्या आणि याच काळात कथक नृत्यातील गुरूपरंपरेचे एक नवीन पर्व सुरू झाले.
पं कुमुदिनी लाखिया: कदंब फ़ेसबुक पेजवरून साभार |
आज ज्याला विद्वानांनी adapted gurukul
system म्हणजेच रूपांतरित-गुरुकुल-पद्धती म्हटले आहे, या पद्धतीला निम-संस्थागत
असेही म्हणता येईल. (पहा: Stacey Prickett: Pedagogic Shifts in South Asian Dance Training in India
and Britain)
यात गुरू एखाद्या
संस्थेशी संलग्न राहून, संस्थेने ठरवलेल्या अभ्यासक्रमाच्या चौकटीत विद्यार्थ्यांना
नृत्यशिक्षण देत मात्र प्रत्यक्ष नृत्यशिक्षण गुरुशिष्य पद्धतीप्रमाणे गुरूंच्या
स्वतःच्या पद्धतीने, तसेच शिष्याच्या क्षमतांना लक्षात घेऊन होत असे. गुरूंनी अभ्यासक्रमाची
चौकट स्वीकारली तरी प्रत्यक्ष तालीम अभ्यासक्रमाच्या पुष्कळ पलिकडे होत असे. कथकच्या
परंपरेने या काळात संस्थागत रूपात परिवर्तित होतानाही याच adapted gurukul
system मुळे गुरू-शिष्य परंपरेचाही आधार राखला. पुणे, मुंबई, अहमदाबाद, कोलकाता अशा
अनेक शहरांमध्ये, अशा प्रकारे अनेक गुरूंच्या छत्रछायेखाली उत्तम नर्तक तयार झाले.
याच adapted gurukul system चे आणखी पुढचे रूप
म्हणजे आज क्लास किंवा अकॅडमी रूपात चालणारे नृत्यशिक्षण. कथकचा प्रचार प्रसार झाल्यानंतर कथकला खूप वेगवेगळ्या प्रकारे पाहिले गेले, अभ्यासले गेले. कथक आता केवळ एक
नृत्यप्रकार न राहता, विद्यार्थ्याच्या जडणघडणीतील एक लाईफ़-स्किल म्हणून त्याकडे पाहिले
जाऊ लागले. शिवाय, प्रामाणिकपणे नृत्य शिक्षण देणाऱ्या अनेक नर्तक-शिक्षकांमुळे कथकचा
प्रसार शहरी व निम-शहरी भागात झपाट्याने होऊन कथक विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि
कथकच्या गुरू-शिष्य परंपरेने आणखी एक नवीन वळण घेतले.
विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे दर्जावर परिणाम
होऊ न देणे हे एक आव्हान शिक्षकांपुढे असते. त्यातही कथकच्या विद्यार्थ्यांची संख्या
वाढली तरी, प्रत्येकालाच भविष्यात पूर्ण-वेळ कथक नर्तक-शिक्षक होणे जमत नाही. वर
म्हटल्याप्रमाणे, अनेकांना छंद म्हणून, लाईफ़ स्किल म्हणून, कधी अन्य
नृत्यप्रकाराला जोड म्हणून कथकचे शिक्षण घ्यायचे असते.
आणखी एक खूप महत्त्वाचा बदल नृत्यकलेच्या बाबतीत झाला
तो म्हणजे, आता नृत्य ही मनोरंजनासाठी पाहण्याची कला न राहता, स्वतः नृत्य शिकण्यास
अधिक लोक उत्सुक झाले. म्हणजेच, प्रेक्षक म्हणून शास्त्रीय नृत्याचा आनंद घेणाऱ्या
व्यक्तींच्या संख्येएवढीच, अंमळ जास्तच, स्वतः नृत्याचे धडे घेऊन त्याचा आनंद घेणाऱ्यांची
संख्या वाढली. नृत्य presentational कमी आणि participational जास्त झाले आहे.
अशा वेळी क्लास किंवा अकॅडमी आज प्राथमिक स्तरावर,
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या चौकटीतले मात्र शिस्तबद्ध ट्रेनिंग देताना दिसतात.
मात्र जोडीने त्या प्राथमिक स्तराच्या संख्येतील मोजक्या प्रतिभावान विद्यार्थ्यांकडे
खास लक्ष देऊन त्यांना कथकच्या क्षितिजांची ओळख करून दिली जाते. छंद म्हणून नृत्य शिकणाऱ्यांमधून,
नृत्यांकडे गांभीर्याने पाहणारे विद्यार्थी जेव्हा प्रगत स्तरावर येतात तेव्हा मात्र,
या अकॅडमीचे रूपातंर गुरूकुलात होऊन, गुरूशिष्यपरंपरेप्रमाणेच कठोर परिश्रम, प्रत्येक
शिष्याच्या क्षमतेनुसार वैयक्तिक अध्यापन, नृत्यसंबंधित वादन वगैरे विषयांचे शिक्षण
असा परिपूर्ण गुरुकुल अनुभव द्यायचा प्रयत्न शिक्षक करतात. या नवीन रूपांतरित-गुरू-शिष्य
परंपरेच्या रूपात प्राथमिक स्तरावर संस्थागत अभ्यासक्रम मात्र प्रगत स्तरावर गुरूशिष्य-परंपरा
असे स्वरूप असते.
गुरुवर्या डॉ. मंजिरी देव |
शिक्षण पद्धतीची वर चर्चा केलेली सर्व मॉडेल्स
(प्रारूपे) ही त्या त्या काळातली आदर्श मॉडेल्सची वर्णने आहेत. मानवी दोष, सर्वच
प्रकारच्या प्रारूपांमध्ये होतेच, आहेत.
एकूण गुरूशिष्यपरंपरा पद्धतीचा प्रवास पाहता गुरुकुल
पद्धत, विद्यापीठ किंवा महाविद्यालय पद्धत आणि शेवटची adaptive गुरुशिष्य परंपरा यांचे गुण व दोष पुढील तक्त्यात दाखवले आहेत.
गुरूकुल
|
महाविद्यालयीन/संस्थागत
|
Adaptive गुरूकुल
|
शिष्याला त्याच्या
क्षमतेप्रमाणे/ कलाप्रमाणे वैयक्तिक प्रशिक्षण. शिष्य आपल्या
वेगानुसार शिकू शकतो.
|
सर्वांना समान अभ्यासक्रम समान वेळेत पूर्ण करायला लागतो.
शिक्षणात सरसकटपणा अधिक. अभ्यासक्रमाचा स्तर सरासरी विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार
ठेवल्यामुळे, प्रतिभावान विद्यार्थ्यांची प्रगती तोकडी.
|
अभ्यासक्रम बहुतेक सर्वांना समान असला तरी, शिष्याच्या
वेगानुसार आणि क्षमतेनुसार, पद्धत, वेळ याबाबतीत बदल करणे शक्य.
|
गुरूंवर अभ्यासक्रम पूर्णपणे अवलंबून असल्यामुळे,
गुरूंच्या वैयक्तिक मानवी दोष, राग, लोभ यांचा परिणाम शिष्याच्या तालमीवर
होण्याची शक्यता
|
विद्यापीठाच्या नियमाबरहुकुम शिक्षण देण्याचा बडगा.
एकच गुरू/शिक्षक कायम राहतील असेही नाही.
|
गुरूंवर अवलंबून असणे येथेही आहेच त्यामुळे, गुरूंच्या
वैयक्तिक दोषांचे परिणाम होण्याची शक्यता आहे.
|
गुरू आणि शिष्याचे व्यक्तिगत भावनिक नाते. शिष्याचे
व्यक्तिशः नर्तक म्हणून घडणे.
|
अभ्यासक्रम पूर्ततेवर अधिक भर.
|
अभ्यासक्रम पूर्ततेवर जोर प्रकारात आहेच. अध्यापन अनेक
विद्यार्थ्यांना एकत्र होत असल्यामुळे, नर्तकाची वैयक्तिक घडण्याची प्रक्रिया
मर्यादित.
|
गुरू बहुदा प्रत्यक्ष नर्तक आणि performing artist असतील तर,
सादरीकरणासाठी शिष्यांची उत्तम तयारी. मात्र स्वतः performer असतील तर शिष्यांना वेळ देणे मर्यादित.
|
अभ्यासक्रमावर भर, सादरीकरणाचा विचार त्यामानाने कमी. अनेक
अशा पैलूंवर अनावश्यक भर दिला जातो, ज्या गोष्टी खरे तर सादरीकरणात कधीच उपयोगी
नसतात.
|
परीक्षा पद्धतीमुळे सादरीकरणाकडे दुर्लक्ष. मात्र आज अनेक
गुरू या पद्धतीमध्ये, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि केवळ सादरीकरणासाठी तालीम घेणारे
विद्यार्थी वेगळे काढून त्यांना तशी वेगळी तालीम देतात.
किंवा परीक्षा पद्धतीने पदवी पूर्ण झाल्यावर नव्याने
सादरीकरणाकडे विद्यार्थ्यांना वळवतात.
|
बहुधा शास्त्र अभ्यासावर भर कमी.
|
शास्त्र अभ्यास सुनियोजित अभ्यासक्रमानुसार घेतला जातो.
|
शास्त्र अभ्यासावर किती भर द्यायचा हे गुरूंच्या पद्धतीवर
अवलंबून, परंतु, परीक्षेस आवश्यक शास्त्र अभ्यास केला जातो.
|
संस्थागत सुविधा उपलब्ध नाहीत.
|
अनेक सोईसुविधांचा लाभ, जसे ग्रंथालय, सभागृह, वाद्य, रेकॉर्डिंग
व्यवस्था इ.
|
संस्थागत सुविधा उपलब्ध नाहीत.
|
अन्य शैली, अन्य गुरूंकडे वर्कशॉप इ प्रकारे शिक्षण घेण्यास
निर्बंध
|
असे निर्बंध नाहीत.
|
निर्बंध गुरूंनुसार.
|
गुरूंच्या परवानगी
शिवाय स्वतंत्र काम करणे शक्य नाही. आधीच्या पिढीतील अनेक नर्तकांचे उशीरा सुरू झालेले
स्वतंत्र काम याच कारणामुळे दिसून येते.
|
अभ्यासक्रमपूर्ती झाल्यावर विद्यार्थी स्वतंत्र
|
गुरूंची परवानगी शिष्यांना आवश्यक मात्र, त्याचबरोबर,
पदवी प्राप्त झालेली असते.
|
भविष्यातील सादरीकरणाच्या संधींबद्दल गुरूंकडून मार्गदर्शन
आणि सहाय्य
|
व्यावसायिक अनुभव मिळत नाही.
|
गुरूंसह सादरीकरणात सहभाग, तसेच अकॅडमी मध्ये प्राथमिक
विद्यार्थ्यांना शिकवताना, अध्यापनाचा अनुभव
|
सध्या सुरू असलेल्या कोरोना-साथीच्या लॉकडाउन काळात, या तिन्ही पद्धतींच्या पलिकडे जाऊन, पुन्हा एकदा गुरू-शिष्य परंपरेचे मंथन होण्याचा हा पर्व काळ आहे, असे दिसते. ऑनलाईन व्हिडिओ कॉल माध्यमातून वैयक्तिक तालीम देणे, एका वेळी कमी शिष्य एकत्र घेणे, हे नव्याने शक्य झाले आहे. आणि त्याचवेळी दोन-दोन दिवसांच्या वर्कशॉप प्रकाराच्या शिक्षणाचे पेव फ़ुटले आहे. सोशल मिडियावर भरमसाठ मटेरियल उपलब्ध झाले आहे. या काळात शिक्षण पद्धती कोणते वळण घेते हे येणारा काळच ठरवेल.
गुरू शिष्य परंपरा ही कथकच्या शिक्षणपद्धतीचा आत्मा आहे,
ती पूर्वी होती आणि आता नाही, पुढे असेल, नसेल, असे म्हणणे चुकीचे ठरेल. गुरू-शिष्य
परंपरा प्रत्येक युगात नवीन रूप धारण करते, मात्र, जेथे जेथे गुरूंची शिष्याला
भ्रमर-गुरूप्रमाणे आपल्यासारखेच करण्याची आणि आपण जेथे पोहोचलो, त्याच्या पुढचा
मार्ग शिष्याला दाखवण्याची तळमळ आहे, जिथे जिथे शिष्याची समर्पणाची तयारी आहे, तेथे
तेथे गुरू शिष्य परंपरा आहेच. समर्पित शिष्य पुढेही समर्थ गुरू बनून कोणत्याही
मॉडेल मध्ये, गुरू-शिष्य परंपरेचा हा अंतस्रोत जागृत ठेवतील, मग ते गुरूकुल असो वा
क्लास, महाविद्यालय असो अथवा ऑनलाईन सेशन.
शिक्षण पद्धतीची वर चर्चा केलेल्या प्रत्येक मॉडेलचे
फ़ायदे-तोटे असले तरी, शिष्याने यातील कोणत्यातरी एकाच पर्यायावर न थांबता एकाहून
अधिक पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. गुरूशिष्य परंपरेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी
एखाद्या विद्यापीठ अथवा महाविद्यालयाच्या पदवीचा जरूर विचार केला पाहिजे त्याचबरोबर,
गांधर्व महाविद्यालयासारख्या संस्थांनी आपल्या पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमाबरोबर
गुरू शिष्य पद्धतीने एखाद्या ज्येष्ठ गुरूंकडे तालीम घेणे नियमाने अनिवार्य
केले पाहिजे. ज्या तिसऱ्या adaptive गुरुकुल पद्धतीबद्दल पाहिले, त्याही पद्धतीत गुरूंनी,
संस्थात्मक आणि गुरुकुल दोन्ही पद्धतींचे लाभ विद्यार्थ्यांना करून देण्याचे ध्येय
ठेवले पाहिजे.
गुरूशिष्य परंपरा अखंड ठेवतानाच, काळाला अनुसरून काही गृहितके नव्याने तपासून पहायला हवीत. गुरूंप्रती संपूर्ण शरणागतीचे
संस्कार करतानाच, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास निर्बंध नको. आपलीच शैली
सर्वोत्तम असा अट्टाहास न करता इतर शैलींच्या आणि वैश्विक नृत्यप्रकारांच्या बाजूला
ठेवून, तुलनात्मक विश्लेषण करून, आपल्या शैलीबद्दल डोळस श्रद्धा शिष्य ठेवतील,
याची गुरूंनी काळजी घ्यायला हवी.
शेवटी प्रसिद्ध संशोधक Kersenboom यांच्या वाक्याने चर्चेचा शेवट करणे योग्य ठरेल:
“Tradition cannot
be defined conclusively in terms of ‘the same’ or ‘change’; tradition is
different from stasis and different from change; it changes and does not change
at the same time.”
No comments:
Post a Comment