राधा, कृष्ण आणि सखी, गीतगोविंदावर आधारित कांगडा शैलीतील चित्र (शासकीय वस्तुसंग्रहालय, चंदिगड) |
कथकच्या अभिनय अंगात प्रामुख्याने गीताधारित नृत्यरचना सादर
केल्या जातात. यात नर्तक एकाच
वेळी अभिनय आणि ताल-लयीचे सौंदर्य यांचा
उत्तम मेळ सादर करू शकतो. कथकच्या भावांगावर ठुमरीचे अधिराज्य असले तरी याखेरीजही
अनेक शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गीतीप्रकार कथकमध्ये सादर केले जातात. अनेक
संतकवींची भजने, स्तोत्रे, उपशास्त्रीय प्रकार जसे चैती, होरी, त्याचबरोबर
गायनाच्या प्रभावामुळे तसेच इतर नृत्यशैलींच्या प्रभावामुळे प्रचलित झालेले
काही प्रकार सादर केले जातात जसे ध्रुपद, चतुरंग, अष्टपदी इ.
अष्टपदी कथक नृत्याच्या सादरीकरणात तशी क्वचितच सादर केली
जाते, परंतु, अष्टपदीचा आठ पदांचा विस्तार आणि विषयवस्तु यामुळे कथक नृत्य
अध्ययनात, विशेष करून अभिनयात प्रगल्भता यावी म्हणून अष्टपदी वरील नृत्याचा विचार
अतिशय महत्त्वाचा आहे. प्रस्तुत लेखात अष्टपदी आणि कथकच्या अनुषंगाने पुढील
मुद्द्यांचा विचार करणार आहोत:
1. अष्टपदी गीती-प्रकार: उगम आणि प्रसार
2. कथकमधील अष्टपदी
3. कोणत्याही आठ पदांच्या रचनेला अष्टपदी म्हणता येईल का?
1. अष्टपदी गीतीप्रकार: उगम आणि प्रसार
अष्टपदी याचा शब्दार्थ आठ पदांचे गीत असा होतो, मात्र केवळ
शब्दार्थावरून कोणत्याही आठ पदांच्या रचनेला अष्टपदी या प्रकारात मोडता येणार
नाही. अष्टपदी ही संज्ञा ज्ञात आणि प्रचलित झालेली दिसते ती जयदेवाच्या
गीतगोविंदापासून. आठ पदे असलेल्या अनेक रचना वेद व पुराणांपासून, अष्टकादि
स्तोत्रांपर्यंत प्रचलित होत्या मात्र, परंपरेने त्या आधी कधी त्यांना अष्टपदी अशी
संज्ञा दिलेली नाही.
ज्याने स्वतःला आपल्या काव्यात ’शृंगार सारस्वत’ म्हटले
आहे, त्या कवी जयदेवाच्या गीतगोविंद या लघुकाव्यातील गेय प्रबंधांना साहित्य तसेच
संगीत परंपरेने अष्टपदी असे म्हटले आहे. अर्थात, जयदेव स्वतः अष्टपदी असा शब्द
वापरत नाही, तो आपल्या रचनांना, प्रबंध म्हणतो, जो शब्द आजही कर्नाटक संगीत पद्धतीत
’बंदिश’ अशा संदर्भाने वापरला जातो.
जयदेवाच्या गीतगोविंदाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने तत्कालीन संस्कृत परंपरेतील काव्याचे
रचनाबंध (फ़ॉर्मॅट) आणि संस्कृतात प्रचलित छंद सोडून, इतर प्राकृत, खासकरून अपभ्रंश
भाषेतील रचनाबंधांचा आणि वृत्तांचा वापर केला. त्यामुळे
अष्टपदी हा रचनाबंध (आठ पदांचे शृंगारकाव्य) कदाचित तत्कालीन प्राकृत भाषेत आधीच प्रचलित असेल, जो जयदेवाने संस्कृतात आणला. मानसोल्लासात सोमेश्वराने
सिद्धाचार्य या बौद्ध कवीच्या चर्यागीतांबद्द्ल सांगितले आहे, ज्यांची रचना
अष्टपदीसारखी भासते. अशाच काही प्राकृत रचना अष्टपदी रूपात आधीच प्रचलित असतील, मात्र संस्कृतात आणि एकूणात मुख्य प्रवाहात
अष्टपदी जयदेवापासूनच प्रचलित झाल्या असे म्हणू शकतो.
राधेचं मन वळवणारी सखी, कांगडा शैलीतील चित्र (Lumbagraon Gita Govinda" Series, Brooklyn Museum) |
गीत गोविंद हे राधाकृष्णांच्या प्रीतीचे शृंगार काव्य आहे.
राधा, कृष्ण आणि सखी या तीन पात्रांत रंगणाऱ्या या विविध अष्टपदींमध्ये, संयोग आणि
वियोग शृंगार, आणि अष्टनायिकांचे सगळे प्रसंग सामावले आहेत.
नावाप्रमाणेच गीत गोविंदातील या अष्टपदी हे पठणाचे श्लोक
नसून, गेय गीते आहेत, ती सुनिश्चित राग तालात बांधलेली आहेत, तसेच परंपरेने
राग-तालांसह त्यांचे जतन केले आहे. स्वतः जयदेव कवी या गीतांचे गायन करत आणि
त्यांची पत्नी पद्मावती या गीतांवर नृत्य सादर करत असे, असा उल्लेख आहे. त्यामुळे या गीतांची रचना संगीत-नृत्य
सादरीकरणाच्या दृष्टीने केली गेली होती असे म्हणता येईल.
अष्टपदी हा शब्द खासच जयदेवाच्या प्रबंधासाठीच प्रसिद्ध
झाला. आज कथक खेरीज इतर सर्व शैलींमध्ये अष्टपदी हा प्रकार सादर केला जातो.
ओडिसीमध्ये तर भावांगाचा मुख्य भाग अष्टपदी आहेत. मात्र जयदेवाच्याच अष्टपदी,
अष्टपदी म्हणून सादर केल्या जातात. ओडिसीमध्ये अनेक ओरिया भाषेतील गीते सादर केली जातात जी कविसूर्य सारख्या ओरिया कवींनी
गीतगोविंदावर आधारित म्हणून रचली आहेत. मात्र सादरीकरणात त्यांना अष्टपदी म्हणून
सादर केले जात नाही. अष्टपदी जयदेवाची सादर केली जाते.
जयदेवाच्या अष्टपदी प्रसिद्ध झाल्यानंतर, अष्टपदींनी
प्रभावित होऊन त्यावर आधारित अनेक रचना केल्या गेल्या. कवि रामपाणि यांनी अगदी याच
धर्तीवर ’गीतरामम्’ या रामकथेवर आधारित अष्टपदी रचल्या. महाकवी विद्यापती ठाकुर हे
मैथिली भाषेतील कवी. त्यांना ’अभिनव जयदेव’ म्हटलं जात असे. त्यांनी गीतगोविंदावर
आधारित पदावल्या संस्कृतात तसेच मैथिलीमध्ये लिहिल्या, चैतन्य महाप्रभू
गीतगोविंदाकडे ओढले गेले
ते आधी विद्यापतींच्या अष्टपदी वाचूनच. गुजरातेत कवी नरसी मेहतांनी शृंगारमाला
लिहिली. स्वामी नारायण तीर्थांनी अठराव्या शतकात गीत-गोविंदाच्याच रचनाबंधानुसार
कृष्ण लीला तरंगिणी लिहिली. मात्र, या पुढील सर्व कवींनी अष्टपदी किंवा अष्टपदी
सदृश रचना करताना, जयदेवाच्या परंपरेचे अनुसरण केल्याचा उल्लेख केला आहे.
जयदेवाच्या अष्टपदी दक्षिणेतही पुढे पुष्कळ प्रसृत झाल्या.
दक्षिणी संगीतात तर प्रबंध प्रकार म्हणून अष्टपदी रुजलीच पण त्याचबरोबर, काही
धार्मिक कार्यांचा ती अविभाज्य भाग बनली. सोपान पद्धतीने गायली जाऊ लागली.
अष्टपदींवर आधारित नृत्यनाट्य सादर केले जाऊ लागले ज्याला अष्टपदी-आट्टम् असे
म्हटले गेले. अष्टपदींवरच आधारित कृष्णनाट्टम हाही एक नाट्यप्रकार रूढ झाला होता,
जो श्री मानवेद कवीच्या काव्यावर आधारित प्रकार असून यात आठ भागात अष्टपदी आठ
रात्री सादर केल्या जात असत. या दोन्ही नाट्य-नृत्य प्रकारांना आज नर्तक नव्याने नवसंजीवनी देत आहेत. खालील व्हिडिओमध्ये या पुनरुज्जीवित अष्टपदी-आट्टम ची झलक दिसून येते, ज्यात - राधा-कृष्ण आणि सखी बरोबरच जयदेव व त्यांची एक पत्नी हेही एक पात्र आहेत. अशा प्रकारे अष्टपदी आणि जयदेव यांच्यातील समानार्थीत्व अधोरेखित होईल.
अगदी अलिकडच्या काळापर्यंत ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीत
अष्टपदी गीतीप्रकार म्हणून प्रसिद्ध होती. बडे बालकृष्णबुवा यांनी सादरीकरणाच्या
उत्तरार्धात, छोट्या ख्यालाप्रमाणे अष्टपदी सादर करण्यास सुरुवात केली आणि पुढेही
अनेक गायकांनी अशा अष्टपदी सादर केल्या. मात्र, जयदेवाच्याच विविध अष्टपदी
ग्वाल्हेर घराण्याच्या परंपरेत प्रचलित झालेल्या दिसतात.
अशाप्रकारे अष्टपदी, हे कोणत्याही आठ कडव्यांच्या गीताला
मिळालेले नाव नसून, जयदेवापासून सुरू झालेली ही एक अष्टपदी-परंपरा आहे, जी
साहित्य, गायन, नृत्य व नाट्य या सर्व माध्यमांमध्ये दिसून येते.
कथकमधील अष्टपदींचे सादरीकरण :
अष्टपदी ही कथक परंपरेत कधी सादर केली जाऊ लागली याचा
निश्चित पुरावा सापडत नाही. कथकमध्ये आज जयदेवाच्या अष्टपदी सादर केल्या जातातच पण
त्याच बरोबर, कथक-महर्षि पं.बिंदादीन महाराज यांची अष्टपदी ’निरतत ढंग’ अधिकतम
वेळा सादर केली जाते. ही अष्टपदीची बंदिश कथकच्याच काही परंपरांमध्ये, भजन किंवा
पद म्हणून सादर केलेली दिसते.
त्यामुळे, मूळ रचनाकारांनी याला अष्टपदी म्हणून रचले होते की
रचनाबंध-साधर्म्यामुळे नंतर ही अष्टपदी प्रकारात प्रचलित झाली याचा निश्चित पुरावा
सापडत नाही. मात्र, अष्टपदी परंपरेची सर्व वैशिष्ट्ये यात दिसून येतात. एकाच
वृत्तातल्या आठ कडव्यांच्या या अष्टपदीत रासनृत्याच्या प्रसंगाचे व त्या अन्वये प्राचीन
कथक नृत्याच्या विविध अंगांचे वर्णन आहे. ’निरतत ढंग’ हे सुकुमार नर्तनाचे सूत्र,
कृष्णाच्या शृंगारात, गोपींच्या नृत्यात, राधेच्या वर्णनात समान आहे, जे प्रत्येक
अंतऱ्यानंतर पुनरावृत्त होते. याखेरीज आणखी एक अष्टपदी विशेष करून
जयपूर घराण्याच्या परंपरेत प्रचलित आहे. ’नंदनंदन नाचत सुढंग’ ही अष्टपदी सूरदासांची रचना म्हणून प्रसिद्ध आहे. विषयवस्तु अष्टपदी अनुसार असली
तरी, या रचनेचे केवळ दोन अंतरे प्रचलित आहेत. तसेच, आणखी एक
महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूरदासांची ही रचना केवळ कथकच्या परंपरेतच रूढ आहे, अन्य
हिंदी साहित्यात या रचनेचे संदर्भ सापडत नाहीत.
अष्टपदी आणि अष्टक –
कोणत्याही आठ कडव्यांच्या गीतास अष्टपदी म्हणता
येईल का?
अष्टपदी आणि अष्टक या दोन प्रकारांमध्येही विशेष करून
कथकारांमध्ये गल्लत दिसून येते. या दोन प्रकारांमधील भेद पुढील प्रमाणे स्पष्ट
करता येईल. अष्टक हे स्तोत्र-प्रकारातील आठ पदांच्या/अंतऱ्यांच्या समूहास दिले जाणारे नाव आहे.
अष्टके ही अष्टपदी प्रकारांपेक्षाही प्राचीन आहेत. एखाद्या देवतेची स्तुती,
साधारणपणे समान वृत्तातल्या आठ पदांनी केली जाते तेव्हा त्यास अष्टक म्हणायची
पद्धत आहे, अष्टकाप्रमाणेच इतरही संख्यांची स्तोत्रे आहेत, षटक, एकादश इ.
मूळात लघुकाव्यांचे शृंगारिक (emotive) आणि भक्तिविषयक (devotional)
असे जे दोन ढोबळ प्रकार केले जातात, त्यात अष्टपदी शृंगारिक
प्रकारात मोडते, आणि अष्टक भक्तिविषयक.
(जयदेवाची पहिली अष्टपदी जय जगदिश हरे ही याला
अपवाद, कारण ती एकूणात त्याच्या रचनेची सुरुवात असल्यामुळे, अष्टपदी-संग्रहाची
पहिली अष्टपदी भारतीय परंपरेनुसार, ईशवचनाची असणे सहाजिक आहे.)
अष्टपदी हा तांत्रिकदृष्टया द्विधातु-प्रबंध अशा बंदिश
प्रकारात मोडतो. द्विधातु म्हणजे एक पल्लवी आणि अनेक चरणे किंवा एक स्थायी आणि
अनेक अंतरे. तसेच स्थायीमधील पंक्ती प्रत्येक अंतऱ्यानंतर पुनरावृत्त होते.
अष्टकात ही पुनरावृत्ती असेलच असे नाही.
अन्त्यानुप्रास, म्हणजेच पदाच्या शेवटच्या शब्दाने यमक
जुळवणेही खास करून अष्टपदीत दिसून येते, अष्टकात ते असलेच पाहिजे असा नियम नाही.
अष्टपदी हा मूळात गेय प्रकार आहे, गीताप्रमाणे सादर केला
जातो. स्तोत्रही गीताप्रमाणे सादर केला जाऊ शकते, पण मूळात त्याची रचना पठणासाठी
केलेली असते, गायनासाठी नाही.
अशा प्रकारे, अष्टक आणि अष्टपदी हे दोन निश्चित वेगळे
प्रकार असून, श्रीकृष्णाष्टक, मधुराष्टक इत्यादिंना अष्टपदी अंतर्गत समाविष्ट करता येणार नाही.
किंबहुना, कोणत्याही आठ पदांच्या/कडव्यांच्या गीतीप्रकाराला
अष्टपदी असे म्हणता येणार नाही. मूळात आठ हा आकडा काटेकोरपणे जयदेवानेही
वापरलेला नाही. गीतगोविंदातीलही काही अष्टपदी आठपेक्षा कमी किंवा अधिक
पदांच्या आहेत. त्यावर आधारित पुढे ज्या अष्टपदी रचना झाल्या त्यांच्यातही आठ
आकड्याचे काटेकोर पालन केले आहे असे नाही. ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीत जे अष्टपदी गायन प्रसिद्ध होते,
त्यातही जयदेवाच्या रचनेतील स्थायी आणि एखादाच अंतरा घेऊन छोट्या ख्यालाच्या
बंदिशी प्रमाणे गायनाची पद्धत होती, त्यातही आठ पदे गाण्याची परंपरा नव्हती.
तेव्हा अष्टपदी हे आठ-पदांचे गाणे नसून, अष्टपदी ही एक
निश्चित परंपरा आहे त्या परंपरेतील किंवा त्या परंपरेचे अनुसरण करणाऱ्या गीतांनाच
अष्टपदी म्हणता येईल.
अष्टपदी आणि कथकमधील तिचे सादरीकरण असा विचार करता
अष्टपदीची पुढील वैशिष्ट्ये आपल्याला निश्चित सांगता येतील :
1. अष्टपदी जयदेव रचित, जयदेव परंपरेतील असावी किंवा त्या
परंपरेचे अनुसरण करणारी असते.
2. आठ पदांचे गीत असते मात्र, स्थायीची ओळ प्रत्येक
अंतऱ्यानंतर पुनरावृत्त होते. स्थायीच्या पुनरावृत्त होणाऱ्या ओळीत अष्टपदीचे
कथासूत्र (थीम) असते ज्याचा विस्तार अंतऱ्यांमध्ये केला जातो.
3. विषयवस्तु शृंगारिक किंवा मधुराभक्ती संबंधित, तसेच एका
विशिष्ट प्रसंगाचे, कथासूत्राचे वर्णन असते. सामान्य स्तुतीपर विषयवस्तु नसते.
आज कथकमध्ये अष्टपदीचे सादरीकरण अध्ययनाचा भाग म्हणून अधिक
राहिलेले दिसते, कारण
कदाचित आठ कडव्यांमुळे लांबलचक होणारी अष्टपदी सादरीकरणासाठी कंटाळवाणी होत असावी.
मात्र अष्टपदीमध्ये जर आठ आकडा महत्वाचा नसेल तर, अष्टपदीचा विषय स्पष्ट करणारे
दोन ते तीन अंतरे निवडून कथकार सादरीकरणासाठी अष्टपदीचा विचार करू शकतात. तसेच अनेक नाविन्यपूर्ण पद्धतीने कथकमध्ये अष्टपदी हा एक रंजक प्रकार म्हणून सादर करता येऊ शकते.
अष्टपदीतील राधाकृष्णांचा ललित शृंगार कथकच्या इतरही
बंदिशींना साजेसा आहे. त्यामुळे अष्टपदीतील लालित्य, त्याच विषयाला साजेशी अनेक
कवित्त-छंद, अनेक गतनिकास, लहान-लहान गतभाव घालून फ़ुलविता येईल. त्याचबरोबर,
अष्टपदीची छोटी बंदिश, एखाद्या त्याच विषयाच्या विस्तृत ठुमरीच्या प्रारंभी विषय
प्रस्थापित करण्यासाठी घालता येईल.
कथकला साचलेपणातून बाहेर काढून, प्रवाही बनवताना, ज्याप्रमाणे अनेक नवीन रचनाप्रयोग त्यात करणे हा एक मार्ग आहे, त्याचबरोबर जुन्या लोप पावत चाललेल्या रचनाबंधांना शास्त्राच्या चौकटीतले पण आजच्या काळाचे रंग ल्यालेले नवे रूप देणे हाही एक आवश्यक मार्ग आहेच. अष्टपदीचे अभ्यासपूर्ण सादरीकरण हे या दुसऱ्या मार्गाचे उत्तम उदाहरण ठरेल.
No comments:
Post a Comment