Tuesday, August 9, 2016

कथक नृत्यावर श्रीकृष्णचरित्राचा प्रभाव

कथक नृत्यावर श्रीकृष्णचरित्राचा प्रभाव 

 श्रीकृष्णचरित्र:  अद्भुत वीरचरित्र                 Influence of Krishna’s Saga on Kathak


प्राचीन काळापासून वीरचरित्र हे नेहमीच मानवांना प्रेरणादायक ठरले आहे. भारतीय साहित्य, संगीतादि सर्व कलांचा उगम वीरचरित्रांच्या गायनातून झालेला आहे. भारतीय साहित्य-कलेची संपूर्ण इमारतच श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या चरित्रावर उभी आहे. रामायण व महाभारत या आर्ष काव्यांनी श्रीराम व श्रीकृष्णचरित्र भारतीयांच्या जणु रक्तात खेळवलंय, रामकृष्णांच्या लोककथा, लोकगीते, त्यांच्या चरित्रांवर आधारित शिल्पे, लेणी, चित्रे यांनी हे चरित्र भारतीयांच्या जणु नसानसांत भिनवलंय. सहस्र वर्षे आपल्या अनेक पिढ्या या कथा ऐकतच मोठ्या झाल्या आहेत.
त्यातही श्रीकृष्णाचे चरित्र जनमानसास अधिक जवळचे व जिव्हाळ्याचे. श्रीकृष्णाचा अद्भुत जन्म, गोकुळात त्याने फुलविलेले नंदनवन, यशोदेचे वात्सल्य, त्याच्या खोडकर बाललीला, लहानपणीचे वीर पराक्रम, किशोरवयात राधाकृष्णांतील प्रणय, कृष्णाच्या मथुरागमनानंतर गोपींची अवकळा, कंसवध, कौरव-पांडव युध्दातील श्रीकृष्णाचे राजकारण-चातुर्य, युध्दप्रसंगीचे अद्भुत विश्वरूपदर्शन आणि अवतार-समाप्तीच्या वेळचे धीर वैराग्य!
अनेकानेक प्रसंग, अगणित भावना यांनी भरगच्च असे, नऊही रसांचा आगर असे हे कृष्णचरित्र कलाकाराला मोहविणार नाही तरच नवल!
श्रीकृष्णचरित्र एकाच वेळी मानवी व ईश्वरी अंशाने परिपूर्ण आहे. श्रीकृष्ण जसा गोपींचा सखा, यशोदेचा कान्हा, द्रौपदीचा सुह्रद, अर्जुनाचा मार्गदर्शक आहे, त्याचप्रमाणे तो योगेश्वर, परब्रह्म, जगद्-गुरु, भगवानही आहे.

साहित्यात श्रीकृष्णचरित्र :

उपनिषदांपासून कृष्ण या देवतेचे विविध स्थानी उल्लेख मिळतात. छांदोग्य उपनिषदात देवकीपुत्र कृष्णाचा घोर अंगिरसांचा शिष्य म्हणून उल्लेख येतो. महाभारतात व्यासांनी प्रथम पूर्णपुरूष श्रीकृष्णाचे चरित्र रंगवले आणि लोकांना या चरित्राची मोहिनी पडली. परंतु महाभारतामुळे कृष्णचरित्र जरि प्रसिध्द झाले असले तरी कृष्णचरित्रातील बाललीला, रासलीला, गोपींसह क्रीडा इ. जे लोकप्रिय प्रसंग दिसतात, हे रंजक रंग भरले हरिवंशाने आणि त्यापुढे भागवत-पुराणाने. भागवत-पुराणाने तर आपल्या प्रसादिक शैलीने आणि मधुर पदांनी हे वीरचरित्र रसभरित केले. त्यापुढील काळातील असंख्य काव्ये, महाकाव्ये, नाटके, प्राकृत तसेच मराठी इ. प्रादेशिक भाषांतील साहित्यकृति या कृष्णचरित्रावरच आधारलेल्या आहेत. 

भागवत धर्माचा उदय :

भागवत-पुराणापासून कृष्ण भक्तीचा एक महासागर भारतभर पसरला. त्याचे सागराचे नाव होते भागवत-धर्म. कृष्णभक्तीच्या या नव्या लहरीमुळे सर्वच क्षेत्रांना एक नवी दिशा मिळाली. मध्वाचार्य, वल्लभाचार्य यासारख्या आचार्यांनी कृष्णभक्तीवर आधारित स्वतंत्र दर्शने मांडली. चैतन्य-महाप्रभूंसारख्या संतांनी उत्तरेत तर महाराष्ट्रात व दक्षिणेतही अनेक संतकवींनी भागवत धर्माचा झेंडा फडकवला. तामिळ प्रांतातही कृष्णलीलाविषयक प्रबंध नामक रचनांद्वारे अनेक वैष्णव संतकवींनी कृष्णभक्तीचा पुरस्कार केला. अनेक राजकुळांनी भागवत धर्माला आश्रय दिला. १२व्या शतकानंतर भागवताच्या अशा प्रसारामुळे वैष्णव संप्रदाय आणि श्रीकृष्ण भक्ति जणु भारतीयांचा परमधर्म झाले होते. 

कृष्णचरित्राचा ललितकलांवर प्रभाव:

इतक्या प्रभावशाली चरित्राचा, साहित्याचा व संप्रदायाचा परिणाम त्याकाळानंतरच्या सर्वच ललितकलांवर दिसून येतो. रासलीला हा तत्कालीन चित्रकलेचा प्रमुख विषय असे. शिल्पांमध्येही कृष्णाच्या विविध अवतारांचे, कथांचे चित्रण असे.
संगीत व नृत्यही याला अपवाद नव्हते. जयदेवाच्या गीतगोविंदामुळे नृत्यात कृष्णभक्तीचे वारे वाहू लागले. सर्व शास्त्रीय नृत्यशैलींमध्ये आजही गीतगोंविंदातील अष्टपदी सादर केल्या जातात. सर्वच नृत्यशैलींच्या अभिनय पक्षाचा विषय हा प्रामुख्याने कृष्णलीलांवर आधारलेला असतो. वात्सल्य या भावाला या काळात जे रस म्हणून स्थान प्राप्त झाले त्यामागही कृष्णाच्या बाललीलांचा प्रभाव असावा असे वाटते.


कृष्णचरित्र आणि कथक :

कथक हे उत्तर-भारतात विशेष प्रचलित नृत्य आहे. त्यातही वृंदावन व आसपासच्या प्रदेशात त्याचा उगम मानला जातो. साहाजिकच कृष्णचरित्राचा व कृष्णकथांचा पुष्कळ प्रभाव या नृत्यावर आहे. कथक नृत्याचा उगमच मुळी कृष्णाच्या कथा सांगता सांगता झाला असे म्हटले आहे. कथकमधील नृत्त भागाची निर्मितीही रासनृत्यातून झाल्याचे अनेक विद्वान मानतात. असे म्हणतात की सम्राट अकबराच्या काळात वल्लभदास नामक एका कथक नर्तकाने रास नृत्याची रचना केली. ही रचना त्याकाळच्या कथक नर्तकांचा आदर्श होती.
कथकच्या अभिनय भागाचा पाया कृष्णचरित्र आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही.
कथक नर्तक बर्‍याचदा आपल्या सादरीकरणाचा आरंभ कृष्णवंदनेने करतात. कस्तुरीतिलकम् ललाटपटले, वक्षस्थले कौस्तुभम् । अशाप्रकारे कृष्णाच्या अंगोपांगाचे वर्णन करणारी वंदना असेल तर कधी कान्हा रे नंदनंदन असे बाललीलांचे वर्णन असेल.
नृत्तभागाच्या क्रमात येणारी कवित्त-परणे तर कृष्णचरित्राचे प्रतिबिंबच असतात. माखनचोरीपासून, कालियादमनापर्यंत आणि राधाकृष्ण प्रणयापासून विरहापर्यंत कृष्णचरित्रातील कोणताच भाग कवींनी वगळलेला नाही. त्यातही राधाकृष्ण छेडछाडीची कवित्ते लोकप्रिय आहेत. रासलीलेचे साग्रसंगीत वर्णन करणारे लांबलचक छंद प्रसिध्द आहेत. जसे, षोडश कला बिराजे...इ.
गतभावाचा विषय प्रामुख्याने कृष्णाभोवतीच गुंफलेला असतो. यात माखनचोरी, कालियादमन अशा बाललीला, होरी, छेडछाड, गोपीवस्त्रहरण अशा किशोरवयातील लीला तसेच कंसवध, गीताउपदेश अशी कार्ये या सर्वांचा समावेश होतो.
ठुमरीचा तर उगमच कृष्णलीलांसाठी झाला आहे की काय असे वाटावे इतकी ठुमरी कृष्णरंगात रंगली आहे. प्रेमाची छेडछाड असो वा विरहाची व्याकूळता; संशयी मत्सर असो वा शृंगाराचा उन्माद! प्रसंग कोणताही असला तरी ठुमरीचे नायक-नायिका हे नेहमीच राधा-कृष्ण असतात. काहे रोकत डगर प्यारे नंदलाल मोरे, अशी छेडछाड किंवा देखो कान्हा नही मानत बतियाँ, अशी तक्रार किंवा चलो सखी आये शाम खेलनेको अशी रंगलेली रासलीला! ठुमरीचे श्रेष्ठत्व असे की केवळ प्रणय-छेडछाडींच्या ‘वरलीया रंगा’ पुरतंच मर्यादित न राहता ठुमरीने राधा-कृष्णांमधील भक्तीच्या गहिर्‍या नात्याचा वेध घेतला. ‘आज राधिके बनो शाम तुम’ हा खेळ, पुढे जाऊन ‘प्रभु तुम जो राधिका हउँं नंदलाल कहाउ’ अशा कृष्णराधेच्या अद्वैतापर्यंत पोहोचतो. ठुमरीतील श्रीकृष्णचरित्राला असे तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान लाभले आहे.
ठुमरीखेरीज, त्यासारखेच काही इतर प्रकार कथकमध्ये सादर केले जातात जसे, चैती, कजरी, होरी, दोहे, अष्टपदी. याप्रकारांमध्येही बर्‍याचदा नायक श्रीकृष्ण असून श्रीकृष्णकथांचाच प्रामुख्याने अंतर्भाव असतो.
कौशिकी वृत्तीच्या पद, ठुमर्‍यांबरोबरच सात्त्वती वृत्तीतील भजने कथकमध्ये सादर होतात. ही भजनेही कृष्णाच्या बाललीलांनी, वात्सल्याने आणि भक्तिरसाने ओथंबलेली असतात. मय्या मोरी मैं नही माखन खायो असे सुरदासांचे लडिवाळ भजन, मेरे तो गिरिधर गोपाल अशी मीरेची समर्पणाची साद आणि प्रगटे ब्रिज नंदलाल मधील वात्सल्य आणि अद्भुताचा संगम, असे अनेक रंग भजनांमध्ये आपल्याला दिसून येतात. 
अशाप्रकारे कथकच्या अनेक अंगांमध्ये कृष्णचरित्राचा प्रभाव वादातीत आहे. कृष्ण चरित्रामुळेच कथकमधील अभिनयास एकाच वेळी शृंगाराचे लालित्य, बाललीलांचा लडिवाळपणा, भक्तीचे माधुर्य आणि तत्त्वज्ञानाची खोली प्राप्त झाली आहे.

No comments:

Post a Comment