Thursday, August 29, 2019

भरतानुसार नाट्य उत्पत्ती, नाट्य प्रयोजन :


तौर्यत्रिकं नृत्तगीतवाद्यं नाट्यमिदं त्रयम् । -अमरकोश
नाट्य हा शब्द आज नाटक अशा सामान्य अर्थी वापरला जातो. मात्र, प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रात नाट्य या शब्दाचे संदर्भ आणि व्याप्ती वेगळी आहे. नाट्यशास्त्रात नाटय म्हणजे एक अशी दृक-श्राव्य कला ज्यात वास्तव जीवनाचे अनुकरण असेल व हे अनुकरण नाटक, नृत्य, गायन, वादन अशा सर्व माध्यमांतून असेल. म्हणजेच नाट्यशास्त्रात नाट्य ही गायन, वादन, नृत्य आणि नाटक किंवा रूपक यांचे मिश्रण असलेली एक समावेशक कला आहे. मात्र, नृत्य,वादन वगैरेंचा विचार नाट्याचे किंवा नाटकाचे सहकारी किंवा नाटकाच्या एकूण प्रभावाला मदत करणारे अशा दुय्यम स्वरूपात केला आहे, स्वतंत्र कला म्हणून नव्हे. त्यामुळे नाट्यशास्त्रातील नाट्याच्या उत्पत्तीचा विचार हा नाट्याबरोबरच नृत्यादि कलांच्याही उत्पत्तीचा विचार आहे, किंवा नृत्यादि कला ज्याचा अनिवार्य आणि मुख्य भाग आहे अशा नाट्यरूपाच्या उत्पत्तीचा विचार आहे, असे म्हणता येईल.
इतिहासकारांनी नाट्याची उत्पत्ती ऋग्वेदातील संवादसूक्तांमधून मानली आहे. नाट्यशास्त्रातही नाट्याची उत्पत्ती आणि प्रयोजन याबद्दल एक विशेष कथा सांगितली आहे. कथा पौराणिक स्वरूपाची असली तरी तिचे अनेक पदर नाट्याच्या मूळ रूपाबद्दल अनेक वास्तविक पैलू सुचवतात.
त्रेतायुगात सामान्य जनांना जेव्हा षड्रिपूंनी ग्रासले होते, प्रपंचाच्या श्रमांनी दमवले होते, आणि संसाराच्या शोकांनी ताडले होते तेव्हा इंद्रादि देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी विनंती केली:
क्रीडनीयकमिच्छामो दृश्यं श्रव्यं च यद्भवेत् ।
असं काही तरी साधन निर्माण करून आम्हाला द्या जे एकाच वेळी मनोरंजनही करेल आणि प्रबोधन ही, असे साधन ज्यात वेदांचे सार असेल, आणि तरीही सर्व वर्णांना ते उपलब्ध असेल.
तेव्हा मग ब्रह्मवेदाने, नाट्यवेदाची निर्मिती केली. या नाट्यवेदात ऋग्वेदातून पाठ्य म्हणजे शब्द घेतले, यजुर्वेदातून मुद्रादि अभिनय घेतला, सामवेदातून गीत घेतले आणि अथर्ववेदातून रस घेतले. ब्रह्माने तेव्हा भरताच्या शंभर पुत्रांना या नाट्यवेदाची दीक्षा दिली. या शास्त्राचा अभ्यास व अनुशीलन करून त्यानुसार पहिला नाट्यप्रयोग बसवला गेला. अमृतमंथन हा तो पहिला नाट्यप्रयोग इंद्रध्वज-उत्सवाच्या मंगल प्रसंगी सादर करण्याचे ठरले. नाट्यप्रयोग सुंदर झाला आणि देव प्रसन्न झाले, मात्र प्रयोगात विघ्न आले. नटांनी असुरांचे काम इतके चोख वठवले की, ते पाहून असुर संतापले व त्यांनी प्रयोगात विघ्न आणले. तेव्हा इंद्राने आपला ध्वजदंड जर्जर नटांना रक्षणासाठी देऊ केला तर ब्रह्मदेवाने आपले कुटिलक (वक्र-दंड) हे शस्र देऊ केले.
कुचिपुडी नृत्यनाट्य- इंद्रध्वज व कुटिलक
आजही कुचिपुडी सारख्या नृत्यनाट्यांमध्ये, सुरुवातीला इंद्रध्वजाची स्थापना आणि पूजन होते. त्याचप्रमाणे आजही पारंपरिक कुचिपुडी नाट्यप्रस्तुती मध्ये, सूत्रधाराच्या हातात इंद्रध्वज आणि विदूषकाच्या हातात कुटिलक असतो.
नटराज शिवशंकराने तंडु मुनींना व त्यांच्या शिष्यांना रौद्र नृत्याचे प्रशिक्षण दिले. तंडू मुनींमुळे या रौद्र नृत्याचे तांडव असे नामकरण झाले.
या प्रथम नाट्य प्रयोगात तीन वृत्तींचा किंवा शैलींचा समावेश होता. भारती वृत्त ज्यात शब्दांचा किंवा संवादांचा प्रामुख्याने वापर असतो, सात्त्वती वृत्ती ज्यात सात्त्विक अभिनयाचा प्रामुख्याने वापर असतो, आरभटी वृत्ती ज्यात रौद्र आंगिक अभिनयाचा प्रामुख्याने वापर असतो. मात्र ब्रह्मदेवाला यात लालित्य नाही असे वाटले तेव्हा त्यांनी चौथ्या कैशिकी वृत्तीचा अंतर्भाव करण्यास सांगितले. मात्र कैशिकी वृत्तीचे सादरीकरण स्त्रियांशिवाय शक्य नाही. त्यामुळे, या उद्दिष्टासाठी ब्रह्मदेवाने तेवीस अप्सरांची निर्मिती केली. पार्वतीने लास्य नृत्याचे शिक्षण त्यांना दिले. पार्वतीने बाणासुराच्या कन्येला, उषेला लास्य शिकवेले जे उषेने पृथ्वीलोकात प्रसृत केले. नाट्याचे हे नियम आणि पद्धती भरतमुनींनी नाट्यशास्त्रात एकत्र केली.
कथेतून नाट्याच्या मूळ रूपाबद्दल निष्कर्ष :
वरील कथेच्या विश्लेषणातून नाट्याच्या मूळ स्वरूपाबद्दल पुढील निष्कर्ष काढता येतील :
1. नाट्याची उत्पत्ती आणि विकास धार्मिक परिसरात झाला जसे यज्ञादि मंगलप्रसंगी नाट्य सादरीकरण.
2. मूळात नाट्य हे उत्स्फ़ुर्त, अनियोजित लोक कला स्वरूपाचे असावे. मात्र नंतर राजाश्रय आणि विद्वानांचा आश्रय मिळून त्याला सुनियोजित स्वरूप आणि नियमबद्ध असे शास्त्रीय रूप आले असावे.
3. नाट्यवेदास सार्ववर्णिक वेद म्हटले आहे. नाट्य सुरुवातील शूद्रादि बहुजनांकडून केले जात असावे, मात्र नाट्यातील मनोरंजन आणि परिणामकारकता पाहता, अन्य वर्णांनीही त्याचा स्वीकार केला असावा.
4. भरतमुनी व भरतपुत्रांद्वारे लोककलेला शास्त्रीय रूप दिले असावे तसेच नटांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची व्यवस्थित पद्धत सुरू केली असावी.

No comments:

Post a Comment