कलेच्या इतिहासात आणि विकासात, राजाश्रय हा नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. राजाश्रय कलेला सन्मान, कलाकाराला स्थैर्य आणि नवीन निर्मितीसाठी सुकून देतो. उत्तम राजाश्रय मिळालेल्या काळात, कलेने खूप उंची गाठली आहे. मग त्यातही, राजा स्वतः कलाप्रेमीच नव्हे तर विद्वान कलाकार असेल तर सुवर्णयोगच. कथकच्या इतिहासात असा सुवर्णयोग आला होता एकोणिसाव्या शतकात राजा चक्रधरसिंह यांच्या राजवटीत!
19 ऑगस्ट 1905 ला गणेश चतुर्थीला जन्मलेल्या चक्रधर सिंहांनी गोंड वंशाच्या रायगढ राजसिंहासनावर 1924 ते 1947 एवढा दीर्घकाळ राज्यकारभार पाहिला. चक्रधरांचा कट्टर वैष्णव असलेला राजपरिवार सुसंस्कृत आणि कलाप्रेमी होता. वडील भूपदेव संगीताचे चाहते होतेच शिवाय दोन काकाही पखवाज आणि तबला वादक होते. चक्रधरांचे प्राथमिक तालशिक्षण यांच्याकडेच झाले. एखाद्या सुसंस्कृत राजघराण्याला शोभेल अशाच प्रकारे विविध विषयांचे विधिवत सखोल शिक्षण राजांनी घेतले होते. आचार्य महावीरांनी त्यांना साहित्याची सखोल ओळख करून दिली. सदाशिव पंडितांकडून त्यांनी संस्कृतचे ज्ञान मिळवले. संस्कृत भाषेवरील प्रभुत्त्व असल्यामुळेच त्यांनी संस्कृतात अनेक ग्रंथांची रचना केली.
महाराजांच्या आधीच्या पिढीपासूनच रायगढ दरबारात कथकचे मानाचे स्थान होते. जयपूर घराण्याचे जगन्नाथ प्रसाद नृत्यगुरू म्हणून दरबारात नियुक्त होते. त्यानंतर स्वतः चक्रधर सिंहांच्या काळात पं. जयलाल महाराजा 1930 पासून अनेक वर्षे रायगढ दरबारात राहिले. त्यांच्याकडूनच स्वतः चक्रधर सिंहांनी जयपूर घराण्याची तालीम घेतली. याचबरोबर लखनौ घराण्याचे अच्छन महाराजही काही काळ रायगढला होते ज्यांच्याकडून महाराजांनी लखनौ घराण्याची तालीम घेतली. या दोन्ही घराण्याच्या अध्वर्यु नृत्यगुरूंना चक्रधरांनी सन्मान दिला, त्यांच्या कडून शिक्षण घेतले, तसेच रायगढमध्ये अनेक कलाकार त्यांच्या हाता खाली त्यार करवले. या दोन्ही महान गुरूंच्या शिकवणुकीतूनच पुढे महाराजांनी दोन्ही घराण्यांची वैशिष्ट्ये एकत्रित करून आपली स्वतंत्र शैली विकसित केली जी पुढे रायगढ घराणे म्हणून नावारूपाला आली. याखेरीजही प्राथमिक काळात राजांनी ढंढे खाँ, हनुमान प्रसाद, शिवनारायण अशा गुरुंकडून तर नंतरही रायगढला आलेल्या अनेक उत्तमोत्तम नृत्यगुरूंकडून तालीम घेतली. नृत्याबरोबरच ठाकुर लक्ष्मणसिंह आणि प्रख्यात तबला उस्ताद मुनीर खाँ यांच्या कडून तबल्याचे शिक्षण आणि ठाकुरप्रसाद यांच्याकडून पखवाजचे शिक्षण तर नन्हे बाबूंकडून गायनाचे शिक्षण त्यांना मिळाले.
रसिक आणि कलाप्रिय राजा चक्रधर संगीताखेरीज कबुतरबाजी, पतंगबाजी याचेही शौकीन होते.
राजा चक्रधरसिंहांमुळे रायगढ घराण्यात कलेचे वातावरण नव्याने बहरले. किंबहुना कथकच्या इतिहासात रायगढ नावाचे महत्त्वाचे पान लिहिले गेले ते महाराजांमुळेच. पं. जयलाल महाराजांच्या तालमीमुळे चक्रधरसिंहांचा ओढा जयपूर शैलीकडे जास्त होता. विलंबित लयीत काम करणे अधिक पसंद होते, मात्र दरबारातील नर्तकांना दोन्ही घराण्यांचे शिक्षण तर दिलेच पण त्याचबरोबर त्यांच्या स्वतःच्या बंदिशी आणि स्वतःच्या शैलीचेही संस्कारही त्यांना दिले.
कथकच्या पारंपारिक रूपातही चक्रधरसिंहांनी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले. परण, तुकडे हे कथकच्या नृत्तभागाची शान. महाराजांनी या परणांचे अनेक नवीन प्रकार तयार केले किंवा त्या बंदिशींच्या सौंदर्यानुसार त्यांना नाविन्यपूर्ण नावे दिली. जसे बोलांच्या चमत्कृतीनुसार दलबादल परण, चमक-बिजली परण, किलकिल परण (पक्ष्यांच्या आवाजाचा समावेश असलेले), अंग व अर्थानुसार गजविलास, दावानल, दुर्गा लास्य, नवरस परण इ. तसेच राजविलास, कल्लोलिनी, कदंब, मधुगुंज इ रसिक नावे परणांना बहाल केली. याचबरोबर नृत्त बोलांमधून काही अभिनय सादर करायचेही नवीन प्रयोग केले. रायगढच्या शास्त्रीय नृत्याची तेवढी माहिती नसलेल्या प्रेक्षकवर्गाला आकर्षित करण्यासाठी हा महाराजांचा प्रयत्न दिसून येतो. शून्यातून कथकचे असे अभिरूचीसंपन्न प्रेक्षक घडवणे हेसुद्धा महाराजांचे मोठे योगदान आहे.
दल बादल परण :
नगन धेत-तधे तडन्न धा धा, किड् धे-धे-धे, धडन्न धिट
धिट धगन क-त, धगन क-त,
तिट तिट धिट धिट – तडन्न तकिट तक
दिगगिन्नाड धित तगन्न धा
(ताधा, तिटकता घेतिट तगन तागे तिट गदिन तान धा) 3 (धेत धेत दिगन्नाड धिट)
(संगीत कलाविहार ऑक्टोबर 2013 मधून प्राप्त)
स्वतः महाराज नृत्य तालीम तर घेत होतेच मात्र राजपदामुळे सार्वजनिक प्रदर्शन करणे त्यांना शक्य नव्हते. तरी त्यांच्या महालात त्यांचे जे खाजगी नृत्यप्रदर्शन होत असे त्याचे किस्से, अनेक गुरुजनांच्या तोंडी आहेत. असंच एका प्रदर्शनात त्यांनी आव्हान स्वीकारत मटकी उठानेके 20 प्रकार करून दाखवले होते असे म्हणतात.
रायगढ संस्थानाचा मोती महल त्यावेळी लय-ताल-नाद-मय झाला होता. महाराजांनी संगीतकारांना आश्रय तर दिलाच पण त्यांना आवश्यक अशा सुविधा करून दिल्या. रियाजासाठी वेगळा कक्ष किंवा तालीमखाना उपलब्ध करून दिला. कथकारांची रहायची सोय केली. अनेक सामान्य घरातील होतकरू मुलांना किंवा लोकनृत्याचे किंवा संगीताचे अंग असलेल्या मुलांना महाराजांनी शास्त्रशुद्ध शिक्षण द्यायची सोय केली व असेल महाराजांचे अनेक शिष्य पुढे यशस्वी नर्तक झाले.
महालात रोज कथकचे कार्यक्रम चालत मग सणासुदीला तर पहायलाच नको. होळी, वसंतपंचमी आणि महाराजांच्या जन्मदिवशी गणेशचतुर्थीला संगीत कार्यक्रमांची रेलचेल असे. अशा वेळी संस्थानात 2 मांडव घातले जात. एका आम मांडवात सामान्य जनतेसाठी कार्यक्रम असे जेथे अनेक कलाकार कला सादर करत आणि याखेरीज एक खास मंडप आमंत्रित प्रेक्षकांसाठी असे, जेथे अनेक ठिकाणांहून आलेले खास कलाकार कला सादर करत. रायगढ दरबारात असे कथक-उत्सवाचे वातावरण तयार झाले होते की, त्या काळातील प्रत्येक कलाकारासाठी रायगढ दरबारात नृत्यप्रदर्शनाची संधी मिळणे मानाचे समजले जाई. याच काळात जे अनेक मान्यवर कथक नृत्यगुरू काही काळासाठी रायगढमध्ये राहिले त्यांच्यासह आदानप्रदानातूनच महाराजांनी पुढे शास्त्रग्रंथांची निर्मिती केली. कथकसाठी हा काळ पुष्कळ उलथापालथीचा होता. शास्त्रग्रंथातील नृत्याचे वर्णन आणि प्रत्यक्ष सादर केले जाणारे कथक नृत्याचे रूप यात पुष्कळ तफ़ावत होती व त्यात अनेक परकीय घटक नव्याने सामील होत होते. अशा वेळी कथकचे शास्त्र नव्याने सांगणे, नव्याने शास्त्रग्रंथ तयार करणे ही काळाची गरज होती. अशा वेळी महाराज चक्रधरसिंह, जे सर्वार्थाने एक अधिकारी व्यक्ती होते, त्यांनी शास्त्रग्रंथांचे गठन करायचा प्रयत्न केला.
चक्रधरसिंहांची ग्रंथसंपदा:
कथक नृत्यविषयक
असा नर्तन-सर्वस्व हा शास्त्र ग्रंथ चक्रधर सिंहांनी लिहिला. हा ग्रंथ अप्रकाशित
तर आहेच पण हस्तलिखितही केवळ महाराजांच्या कुटुंबीयांकडे आहे. कथकच्या उदयाच्या
काळातील उत्तम दस्तावेज असा हा ग्रंथ, कथकच्या जडणघडणीवर उत्तम प्रकाश टाकू शकेल.
या ग्रंथात नृत्याच्या व विशेष करून कथकच्या सर्व अंगांचा विचार केला आहे.
कथकमध्ये सादर होणाऱ्या अनेक पारिभाषिक शब्दांचे संस्कृत समांतर शब्द राजांनी या
ग्रंथात मांडले असे म्हटले जाते. जसे चक्रदारसाठी त्रिचक्री.
याखेरीज, यांचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे तालतोयनिधी. 1 मात्रा ते 380 मात्रांपर्यंतच्या तालचक्रांचे वर्णन यात केले आहे असे म्हटले जाते. त्या काळात तालविचारात जी जटिलता आली होती, त्याचे प्रतिबिंब या ग्रंथात दिसून येते. तालचक्राचे चित्ररूप म्हणजेच visual representation रंगीत चित्रांच्या रूपात यात केले आहे. हा चित्ररूपात ताल मांडण्याचा विचार नक्कीच नावीन्यपूर्ण आणि अधिक संशोधनास वाव असलेला आहे. ज्ञानसाधने मर्यादित असलेल्या त्या काळात बंदिशींना कलाकार आपली संपत्ती मानत आणि त्यांची देवाणघेवाण हा अतिशय भावनिक विषय असे. राजांनी अनेक उस्तादांना प्रसन्न करून, कधी बक्षिस देऊन तर कधी मोबदला देऊन अगणित बंदिशी मिळवल्या ज्यांचा संग्रह या ग्रंथात आहे असे म्हणतात. म्हणूनच या ग्रंथाला बोलपरणांचा सर्वात मोठा साठा मानले जाते.
मुरजवर्णपुष्पाकर हादेखील चक्रधरसिंहांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. यात नृत्य
तालवाद्य दोन्ही अंगांनी तपशीलवार विचार केला आहे. अनेक पारिभाषिक शब्दांची
लक्षणे, अनेक बोलांचे सचित्र वर्णन असलेला हा ग्रंथ अजूनही अप्रकाशित आहे.
संशोधनाने प्रकाशित झाल्यास, हा ग्रंथ कथक साठी एक चांगला कोश ठरू शकतो.
रागरत्नमंजूषा
या संगीतावरील त्यांचा ग्रंथही वैशिष्ट्यपूर्ण आहे. रागांच्या थाटांनुसार त्यांचे
वंशवृक्ष यात दिले आहेत.
याखेरीजही संस्कृत आणि उर्दू अशा दोन्ही भाषांवर प्रभुत्त्व असलेल्या राजांचे अन्यही काही ग्रंथ आहेत, काही प्रकाशित तर काही हस्तलिखित रूपात आहेत, जसे, काव्यकानन, शब्दकल्पद्रुम, मायाचक्र, रम्यरास, जश्न-ए-फ़रहत इ.
महाराजांना
कलाकार म्हणून, कलेचे आश्रयदाते म्हणून, विद्वान म्हणून तसेच आयोजक म्हणूनही
कलाक्षेत्रात मानाचे स्थान मिळाले. 1938 मध्ये अलाहाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय
संगीत परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भुषवले. त्यांच्या या अध्यक्षीय भाषणात त्यांनी
जुन्या-नव्या विचारांचा संगम कसा करता येईल याबद्दल मौलिक विचार मांडले आहेत. 1939
मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड लिन्लिथगो यांच्या स्वागतासाठी भरलेल्या संगीत परिषदेत
महाराजांच्या शिष्यांनी कार्तिक व कल्याण यांनी नृत्य सादर केले व महाराजांनी
स्वतः तबल्यावर साथ केली होती. यावेळी महाराजांना संगीत सम्राट ही पदवी बहाल
करण्यात आली.
राजा चक्रधरसिंहांनी
अनेक शिष्यांना कथकची उत्तम तालीम मिळेल अशी व्यवस्था केली व रायगढमध्ये अनेक कथक
कलाकार घडवले. वर उल्लेखलेले कार्तिक-कल्याण त्यांपैकीच एक. त्याकाळी भारतभरातील
अनेक नृत्य महोत्सव या जोडीने गाजवले होते. या खेरीज महंत कल्याणदास, पं. फ़िरतू
महाराज, श्री. बर्मन लाल, अनुजराम, रामलाल इ. अनेक नावे घेता येतील. बर्मनलाल मॅडम
मेनका यांच्या नृत्यसंरचनांमध्ये नृत्य करत असत.रामलाल हे पं. कार्तिकराम यांचे शिष्य
आज चक्रधर नृत्यकेंद्र, भोपाळ येथे अध्यापनाचे कार्य करतात.