शास्त्र आणि प्रयोग : सीमोल्लंघन की सीमाविस्तार?
अभूतपूर्व गतिमान अशा
आजच्या काळात जेव्हा प्रत्येक गोष्टीचा निकष वैश्विक स्तरावर तुलना करून लावला
जातो, तेव्हा भारतीय नृत्याने शतकानुशतकांची शास्त्रानुसारी परंपरा जतन करणे, हे
केवळ पुराणातील वांग्यांना जपणे आहे की, आपल्या परंपरेतील कालातीत घटकांना पुढच्या
पिढीसाठी राखणे आहे, याचा शोध कथक नृत्याच्या विशेष संदर्भाने घेण्याचा प्रयत्न या
निबंधात केला आहे.
Ø
शास्त्र आणि कला :
“यस्मिन्देशे
काले निमित्ते च यो धर्मोऽनुष्ठीयते, स एव
देशकालनिमित्तान्तरेष्वधर्मो भवति ; तेन न शास्त्रादृते धर्माधर्मविषयं
विज्ञानं कस्यचिदस्ति|”[1]
एखाद्या ठिकाणी, एखाद्या समयी किंवा एखाद्या कारणाने जो धर्म (योग्य) ठरतो तोच
अन्य ठिकाणी, समयी किंवा कारणाने अधर्म (अयोग्य) ठरू शकतो. त्यामुळे योग्यायोग्याचा
निर्णय शास्त्राशिवाय शक्य नाही.
येथे ज्या देश-काल
सापेक्षत्वाचा विषय मांडला आहे, ती सापेक्षता कलेच्या व त्यातही प्रायोगिक कलेच्या
बाबतीत पुष्कळ प्रमाणात असल्याने, कलेचे योग्य प्रशिक्षण, अचूक मूल्यांकन आणि
मुख्य म्हणजे जतन यासाठी सादरीकरणाला शास्त्राची चौकट अनिवार्य मानली गेली आहे. पाश्चात्त्य
नृत्य समीक्षकांनीही नेहमीच शास्त्रासारख्या एखाद्या चौकटीची आवश्यकता मान्य केली
आहे.
“Dance vanishes;
therefore,....documentation gives the dance the defence it
needs against the accusation of being too trivial.” [2]
शास्त्र आणि कलेचे नाते हे व्याकरण आणि भाषेच्या नात्यासारखे आहे. आधी भाषा
जन्माला येऊन प्रचलित होऊन मग व्याकरण तयार होते आणि पुढे ते व्याकरण त्या भाषेला केवळ
राखतेच असे नाही तर भाषेतील काही बदलांना सामावून घेते तर काही बदलांना
कुंपणाबाहेर ठेवते. शास्त्रीय नृत्याच्या संदर्भात शास्त्रही असेच कार्य करत असते.
भारतासारख्या परकीय आक्रमणांचा इतिहास असलेल्या देशात, शास्त्रीय नृत्याची
शुद्धता टिकवण्याच्या दृष्टीने निकष म्हणून शास्त्रग्रंथांचे कार्य मोठे आहे. त्याचबरोबर नृत्यकलेच्या प्रशिक्षणातही
शास्त्रग्रंथांचे स्थान अनिवार्य आहेच.
शास्त्र ग्रंथ म्हणजे खरे तर त्या काळातील नृत्यसंदर्भांचा एक संग्रह असतो.
भरतमुनीही नाट्यशास्त्रात स्वतःला त्या काळापर्यंत चालत आलेल्या नृत्यपरंपरेचा
संपादक मानतात. शास्त्र तयार होते तेव्हा त्याचा उद्देश पुढील पिढ्यांना संदर्भ
मिळावा, रचनेचा आधार मिळावा हा असतो, नियमांचा चाबूक बसावा अशा उद्देशाने
शास्त्रकारांनी शास्त्ररचना केली नसावी. मात्र कालौघात शास्त्रसंदर्भांचे रूपांतर
अलगद शास्त्राच्या बडग्यात होते आणि मग मात्र शास्त्र विरुद्ध प्रयोग हा संघर्ष
सुरू होतो.
अगदी भरतकाळातही हा संघर्ष आपल्याला दिसून येतो जेव्हा नाट्य आणि नृत्त अशा
दोन प्राचीन प्रकारांमधून नृत्य या नवीन प्रयोगाचा उदय झाल्याचे म्हटले आहे.[3] शास्त्र आणि
काळानुसार प्रवाहित कलेचा प्रयोग यांच्यातील संघर्ष म्हणजे खरे तर प्राचीन नृत्य
आणि वर्तमान नृत्य यांच्यातील किंवा अधिक खोलात जाऊन भूत व वर्तमान काळ यांच्यातील
संघर्ष आहे.
कथकच्या संदर्भात याचा विचार करता कथक कथा-कीर्तन स्वरूपातून रूप-कथक सादरीकरणापर्यंत आणि
पुढे कथक-नृत्यनाट्यापर्यंत परिवर्तनाचा एक मोठा प्रवास करून आजच्या स्वरूपास
पोहोचले आहे. त्यामुळे प्राचीन व मध्यकालीन शास्त्रग्रंथ आणि कथकची गुरू-शिष्य
परंपरा असे दोन शास्त्राधार कथकच्या मार्गी व देसी अंगांना आहेत.
Ø
शास्त्रानुसारी सादरीकरण : रसास्वादाचे उन्नयन
प्रत्येक शास्त्रीय नृत्याला त्याची स्वतःची एक आस्वाद्यता आहे. शतकांच्या
अभ्यासानंतर त्याची रचना गुंतागुंतीची झाली आहे आणि ही गुंतागुंतीची रचना तिच्या
सर्व बारकाव्यांनिशी आणि परंपरागत रूपात सादर होणं हेच शास्त्रीय नृत्याचे
शास्त्रीयत्व आहे, त्याचा आत्मा आहे. जसे कथकचे गतिमान सुंदर हस्तक, हस्तकांनी
नृत्यावकाशात बनलेल्या सुंदर आकृती, भ्रमरींचे चैतन्य, तत्कारांचे कौशल्य आणि
लयकारी, सहज नैसर्गिक अभिनय आणि नफ़ासत, या सर्व घटकांचा मिळून आनंद आणि आस्वाद हाच
’कथक चा आस्वाद’ आहे. ’बॉलिवुड-कथक’ हा शास्त्रेतर प्रकार (चित्रपटगीताचा आधार
तसेच शैलीगत शास्त्रविरोध जसे कंबर हलवणे इ. हालचाली) यात सामावला तर होणारी
सरमिसळ ही कदाचित आस्वाद्य असेलही पण तो ’कथकचा आस्वाद’ नसेल हे नक्की. प्रत्येक
शैलीचे वेगळेपण जपून त्यांचा वेगळा वेगळा आस्वाद घेण्यासाठी त्या त्या शैलीची
शास्त्रीय चौकट जपणं अनिवार्य आहे.
शास्त्रीय चौकट ही नर्तक आणि
प्रेक्षक दोघांना एका समान पातळीवर आणते.
त्यातही शास्त्रीय चौकटीचे पूर्वज्ञान असलेला प्रेक्षकवर्ग असेल तर शास्त्रचौकट दोघांच्या
आनंदाचा समान दुवा बनेल. ताल-सादरीकरणात,
तालाच्या आवर्तनाचे चक्र आणि समेवर पोहोचण्याचे महत्त्व, ही चौकट नर्तक आणि
प्रेक्षक दोघांना त्या तालाच्या एका समान सूत्रात बांधून ठेवते आणि तालाच्या विविध
मात्रांमधून प्रवास करत समेपर्यंत पोहोचायची उत्कंठा आणि सम सौंदर्यपूर्ण रीतीने
गाठल्यावरचा आनंद दोघांनाही अनुभवायला मिळतो. तालचक्राच्या सादरीकरणातील हे
आनंदाचे व ऊर्जेचे आदानप्रदान शास्त्रानुसरणामुळेच होय. शास्त्र चौकटीचा हा समान
दुवा दोघांमधे असेल तर प्रेक्षकांचे पूर्वज्ञान गृहित धरून नर्तक लयवैविध्य,
आकृतिवैविध्य असे अनेक प्रयोग करू शकतो. म्हणजे याअर्थी, शास्त्र हे बंधन घालत
नसून, या सादरीकरणाला नवीन प्रयोगांचे स्वातंत्र्य देत असते.
Ø
शास्त्रानुसरण आणि रसास्वादातील अडथळे :
शास्त्रचौकटीत रसास्वाद घेताना प्रेक्षकांचे पूर्वज्ञान गृहित धरले आहे.
प्रेक्षकांना हे पूर्वज्ञान नसेल, तालचक्राची, ताल सादरीकरणाची प्राथमिक माहिती
नसेल तर मात्र त्यांना प्रयोगाचे आकलनच होणार नाही.
या समस्येखेरीज आणखी एक समस्या रसास्वादात येऊ शकते ती म्हणजे भाषेची.
शास्त्रानुसार पारंपरिक पद सादर करताना पदाची भाषा लोकांना समजली नाही, पदातील
ज्या शब्दांच्या अर्थांचे पदर उलगडून दाखवले जात आहेत, ते शब्दच माहित नसतील तर
त्या पदाचा आनंद प्रेक्षक घेऊ शकणार नाहीत.
शहरी गतिमान जीवनात प्रयोगाचा अवधी पूर्वीप्रमाणे 2-3 तासांचा न राहता अर्ध्या
पाऊण तासावर आला आहे, अशा कमी अवधीत शास्त्रसंमत क्रमाप्रमाणे सगळी अंगे सादर करणे
शक्य होत नाही.
सीमोल्लंघन की सीमाविस्तार
?
प्रयोगस्तरावर या सर्व प्रश्नांची उत्तरे
नर्तकाला नेहमीच शोधावी लागली आहेत. शास्त्रीय नृत्य हे लोकांच्या नियमित
मनोरंजनाचा भाग असणे दुर्मिळ झाल्याने प्रेक्षकांच्या पूर्वज्ञानाचा प्रश्न भेडसावत
आहे. अशा वेळी ताल सादर करताना, प्रेक्षकांशी संवाद साधून सादरीकरण त्यांनी
कोणत्या दृष्टीने पहायचे आहे, हे थोडक्यात स्पष्ट करणे आवश्यक आहे. पदाचे शब्दही
प्रेक्षकांना आधी समजावून देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आज पारंपारिक ब्रिज भाषेतील
पदांसह स्थानिक भाषेतील (मराठी, बंगाली इ.) पदांचाही विचार होणे आवश्यक आहे. या संवादामुळेच, नर्तक प्रेक्षकांना
आस्वाद्यतेच्या एका समान पातळीवर आणू शकेल.
सादरीकरणाचा वेळ मोजकाच मिळाला तरी त्यात नर्तक
आज कथकची प्रमुख अंगे थोडक्यात मात्र रंजक रूपात सादर करतो, जसे थाटांचा विस्तार
कमी करणे, तत्कार विलंबित लयीच्या शेवटी न करता एकदाच पूर्ण तालाच्या शेवटी करणे,
मोजक्याच पण खास तैयारीच्या चीजा नाचणे इ. व्यभिचारी भावांसह ठुमरीचा फ़ुरसतीत
विस्तार करणे आज प्रयोग स्तरावर नेहमीच शक्य होत नाही. नर्तक अशावेळी लहान
ठुमऱ्या, दादरा, लहान बंदिशी भाव अंगासाठी वापरून मोजक्या प्रसंगांतून आपले
अभिनयकौशल्य मांडतो.
विकसित तंत्रज्ञान हा आजच्या नर्तकांसाठी
शास्त्र आणि प्रयोगातील सेतू ठरू शकतो. शब्दांमधून आणि अभिनयातून जो अर्थ सादर
करायचा आहे, तो अधिक ठळकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नर्तक, साजेसा
बॅकड्रॉप किंवा स्क्रीनवर साजेसे चित्र किंवा चित्रफ़ीत वापरू शकतो.
मुगल-ए-आझम नृत्यनाट्य: बॅकड्रॉपचा वापर |
कॉलर माईकसारख्या साधनांद्वारे नर्तक सादरीकरणात
प्रेक्षकांशी संवाद दुपटीने वाढवू शकतो.
शास्त्र चौकट जेवढी अनिवार्य आहे तेवढाच प्रवाही
बदलही अटळ आहे. मात्र, या बदलांची प्रेरणा सर्जनशीलता असावी ’मार्केट’ नाही.
अन्य ’पॉप्युलर’ कलाप्रकारांच्या प्रसिद्धीचा वापर शिडीसारखा करण्याची गरज
शास्त्रीय नृत्याला नाही. मात्र त्याचवेळी शास्त्र आणि कला दोघांनीही परस्परपूरक
पद्धतीने बदलायला हवे. प्रयोग शास्त्रानुसारी होण्यासाठी नर्तकाने प्रयत्नपूर्वक
मार्ग शोधायला हवेत. आणि शास्त्रानेही काळानुसार बदलत्या प्रवाहांना आपल्यात
सामावले पाहिजे. जुन्या नव्याच्या संघर्षात जे उत्तम आहे ते टिकावे, जे केवळ
संपत्ती आणि संख्येने सबल आहे ते नव्हे, कमीतकमी कलेच्या क्षेत्रात तरी.
संदर्भसूची:
·
आंद्रे लेपेकी. (2004). Of the Presence of the Body: Essays
on Dance and Performance Theory. कनेक्टिकट: वेसलिन
युनिवर्सिटी प्रेस.
·
डॉ. पुरू दधीच. (2017). कथक
नृत्य शिक्षा भाग 2. इंदोर: बिंदू प्रकाशन.
·
बादरायण. (1960). ब्रह्मसूत्रशांकरभाष्य.
(वासुदेव
मोहन आपटे, अनु.) पुणे: पॉप्युलर बुक डेपो.
·
मार्गरेट वॉकर. (2014). India's Kathak Dance in Historical Perspective - Margaret. (रूटलेज, सं.)
इंग्लंड: अॅशगेट पब्लिशिंग लिमिटेड.
·
श्रुती घोष. (2017). http://rupkatha.com/kathak-dance/ येथून पुनर्प्राप्त